Saaho Teaser : धमाकेदार अॅक्शनपट 'साहो'ची पहिली झलक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 June 2019

  • गन्स आणि गाड्यांसोबत प्रभासची जबरदस्त अॅक्शन
  • नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांचीही टीझरमध्ये झलक
  • भारतातील सर्वात जास्त बजेट असलेला 'साहो'

साउथचा अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड डॉल श्रध्दा कपूर अभिनित 'साहो' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गेले दोन दिवस 'साहो' हे नावही ट्रेंडींग मध्ये होते. अखेर चित्रपटप्रेमींची प्रतिक्षा संपली आणि साहोची पहिली झलक बघायला मिळाली आहे.

'बाहुबली' नंतर प्रभास हा 'साहो' च्या शूटींगमध्ये व्यस्त झाला, तेव्हापासूनच या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरवातीलाच श्रध्दा कपूर दिसत आहे. प्रभास आणि श्रध्दाचे रोमँटिक संवाद सुरवातीच्या दृश्यात आहेत. पण त्यानंतर केवळ आणि केवळ अॅक्शनचा धमाका टीझरमध्ये बघायला मिळेल. गन्स आणि गाड्यांसोबत प्रभास जबरदस्त अॅक्शन करताना दिसेल. प्रभास हा एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांचीही टीझरमध्ये झलक आहे. प्रभास आणि श्रध्दा पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करताना दिसतील.

'साहो'च्या टीझरमधील दृश्ये ही हॉलिवूडपटाप्रमाणेच वाटतात. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधील 50 लोकांची टीम भारतात बोलाविण्यात आली होती. या टीमने प्रभासला चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. '2.0' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नंतर तिसऱ्या क्रमांकावर भारतातील सर्वात जास्त बजेट असलेला 'साहो' चित्रपट आहे. 300 करोड एवढे 'साहो'चे बजेट आहे. येत्या 15 ऑगस्टला 'साहो' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prabhas Starer Action Pack Saaho Movies Teaser Released