'आईबद्दल कोणी अपशब्द काढले तर मी कसे ऐकून घेईन '

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 4 November 2020

अलका कुबल निर्मित "माझी आई काळूबाई' या मालिकेतून काढल्याची माहिती पसरू लागल्याने प्राजक्ताने पत्रकार संघात आपली भूमिका मांडली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ताशी  वार्तालाप आयोजित करण्यात आला होता.

मुंबई - अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून आले आहे.  सोशल मीडियावरील त्यांच्यातील  आरोप प्रत्यारोप सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यासगळ्या प्रकरणावर प्राजक्ताने अलकाताई हे जर तुमच्या मुलीबाबत झाले असते तर तुम्ही असेच वागल्या असत्या का? असा प्रश्न प्राजक्ताने अलका कुबल यांना विचारला आहे. 

अलका कुबल निर्मित "माझी आई काळूबाई' या मालिकेतून काढल्याची माहिती पसरू लागल्याने प्राजक्ताने पत्रकार संघात आपली भूमिका मांडली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ताशी  वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. ती म्हणाली, मी स्वतः मालिका सोडली. त्यांनी मला काढले नाही. अलका ताईंनी केलेले आरोप अतार्किक आहेत. विवेक सांगळे याने माझ्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

तरीही, केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे योग्य आहे का? त्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे. ज्या माऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्या आईबद्दल कोणी अपशब्द काढले तर ते मी कसे ऐकून घेईन? त्याचे तुम्हाला काहीच वाटू नये? असा संतप्त सवाल उपस्थित करत   प्राजक्ताने उपस्थित केला आहे.

प्रोजेक्ट साइन केला तेव्हा छोटे कपडे घालावे लागतील, असे सांगण्यात आले नव्हते. एका आर्टिस्टना जखम झाली होती, त्यांचे रक्त साडीला लागले होते. ती साडी मला नेसायला देण्यात आली. कोव्हीडच्या काळात असे करणे योग्य नाही. याबाबत माझ्या आईने केवळ प्रश्न उपस्थित केला. त्यावरून माझी आई सेटवर लुडबुड करते, असा आरोप होत असेल तर ते चुकीचे आहे. असेही प्राजक्ताने सांगितले.

य़ासगळ्य़ा प्रकरणावर आपली भूमिका मांडताना अलका कुबल म्हणाल्या,  प्राजक्ता गायकवाड हिने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. 10 नोव्हेंबरला सर्व कलाकारांचे पैसे देणार असल्याचे यापूर्वीचे सांगितले होते. मात्र, प्राजक्ता अनेकदा चित्रीकरणाला उशिरा येत होती. त्याला सर्वच कलाकार कंटाळले होते. त्यामुळे वाहिनी आणि प्रॉडक्‍शन हाऊसने तिला बदलण्याचा निर्णय 21 ऑक्‍टोबरला घेतला. हे समजल्यानंतर तिने 25 ऑक्‍टोबरला मीच मालिका सोडून जाते, असे मेसेज टाकले. तिला वैयक्तिकरीत्या कुणीही शिवीगाळ केली नाही. 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prajaka gaikwad justification on alka kubal statement