प्रेक्षकच आमचे मायबाप!

नाट्य चळवळ पुढे नेण्यामध्ये सर्वांत मोठे योगदान प्रेक्षक देतात. नाट्यक्षेत्रात कलाकारांचे योगदान असतेच, मात्र रंगमंचावर होणाऱ्या चुका स्पष्टपणे सांगून त्या दुरुस्त करण्याची सूचना प्रेक्षकच देत असतो.
Prashant Damle and Tejashri Pradhan
Prashant Damle and Tejashri PradhanSakal

नाट्य चळवळ पुढे नेण्यामध्ये सर्वांत मोठे योगदान प्रेक्षक देतात. नाट्यक्षेत्रात कलाकारांचे योगदान असतेच, मात्र रंगमंचावर होणाऱ्या चुका स्पष्टपणे सांगून त्या दुरुस्त करण्याची सूचना प्रेक्षकच देत असतो. त्यामुळे ही चळवळ पुढे नेण्याचे काम खऱ्या अर्थाने नाट्यरसिक करत असतात. चिरकाल टिकणारा अभिनय करण्याची सवय प्रेक्षकांमुळे नाट्यकलाकारांना लागते.

नाट्यक्षेत्राला पुढे नेण्यासाठी प्रत्येक घटकाने सारखीच मेहनत घेणे गरजेचे आहे. शासनाचे काम आहे नाटकांसाठी नाट्यगृह व संबंधित सुविधा उपलब्ध करून देणे व त्यासाठी एक प्रणाली उभारणे. तसेच ही प्रणाली राखणे हे कलाकार व रसिक प्रेक्षकांचे काम आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील नाट्यरसिक याबाबत अतिशय जागरूक आहेत. या शहरात कलाकार घडले, तसेच रसिकही घडला आहे. या शहरांत नाट्य चळवळीला चालना मिळण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.

प्रेक्षकांचे समाधान महत्त्वाचे

प्रत्येक शहराच्या समस्या वेगळ्या असतात, प्रत्येक शहरातील नागरिकांच्या मागण्या वेगळ्या असतात. मात्र, त्यांना एका समान धाग्याने जोडण्याचे काम सांस्कृतिक क्षेत्र करू शकते. प्रत्येक शहराची संस्कृती वेगळी असते. मात्र, नाटक, लावणी, लोककला या सगळ्यांना एकत्र आणण्याचे काम सांस्कृतिक मंच करू शकतो. सध्या राज्यात ४८ नाट्यगृहे आहेत, तर सत्तर नाट्यगृहे नव्याने बांधण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटी आहे. त्यापैकी १ कोटी रसिकांपर्यंत नाटक पोहोचले, तरी त्या एका नाटकाचे किती प्रयोग होतील? हे गणित केल्यास आपल्याच राज्यात नाटकांसाठी किती मोठी क्षमता आहे हे लक्षात येईल. मी नाट्यक्षेत्रात कामाला सुरुवात केली त्या काळात नाटकाचे प्रयोग किती करायचे हे ठरवून त्यानुसारच तालमी, सराव केला जात असे. नाटकाचे सादरीकरण उत्तमच असावे असा कटाक्ष असे.

तीन तास नाटकासाठी तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना आपला पैसा व वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळावे, असे नाटक आपण दिले पाहिजे, ही बाब प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवली पाहिजे. कलाकाराचा आनंद हा दोन गोष्टींमध्ये असावा, आपल्याला मिळणारे मानधन व नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांना मिळणारे समाधान.

मी १९७६-७७ मध्ये पहिल्यांदा नाटकात काम केले, तेव्हा रंगमंचावर उभे कसे राहायचे, कसे वळायचे याबाबत मला काहीच माहिती नव्हती. सध्याच्या काळात अभिनयाचे धडे दिले जातात. हा बदल नक्कीच चांगला आहे. मात्र, जेव्हा अभिनयाचे धडे घेऊन हे कलाकार अभिनय क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी मुंबईला येतात, तेव्हा त्यांच्या सोयीसाठी नाट्यपरिषदेने ठोस पावले टाकणे गरजेचे आहे.

या कलाकारांच्या राहण्याची सोय करणे, ठरावीक कालावधीपर्यंत त्यांना मदतीचा हात देणे, पडद्यामागील कलाकारांचा विमा काढणे, नाट्यगृह उत्तम राहावीत यासाठी पाठपुरावा करणे यांमध्ये नाट्यपरिषदेने लक्ष घातले पाहिजे.

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धांमुळे कलाकारांना आपला अभिनय सुधारण्याची संधी मिळत आहे. पुढे प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक असा त्यांचा प्रवास होतो. या स्पर्धांमध्ये कलाकाराला रंगमंचावर स्वतःला कायम सिद्ध करावे लागते. कलाकाराने त्यासाठी सातत्याने मेहनत घेणे गरजेचे आहे, कारण त्यातूनच तो कलाकार उत्तम घडतो.

कोरोनापूर्वीच्या काळात वर्षभरात आलेल्या पन्नास नाटकांपैकी तीन ते चार नाटके चालायची. मात्र, आता ही संख्या ८ ते १० नाटकांवर पोचली आहे. नाटक जेवढे चालेल, तेवढा त्याचा दबदबा निर्माण होतो. त्यामुळे मराठी रंगभूमीची घोडदौड नक्कीच चांगली चालू आहे; मात्र ती आणखी पद्धतशीरपणे चालवणे गरजेचे आहे. नियोजन केले जाते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेळ लागतो.

म्हणूनच शासन, नाट्यकलाकार, नाट्यनिर्माते, प्रेक्षक या प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करणे आवश्‍यक आहे. शासन सुविधा देत असल्यास त्यांचा योग्य वापर करून चांगली नाटके आणणे हे नाट्यनिर्मात्यांचे काम आहे. प्रेक्षकांनी या सुविधा योग्यरीतीने वापराव्यात, तर कलाकारांनी आपला अभिनय उत्तम ठेवावा.

नाट्यपरिषदेची जबाबदारी व्यापक

आधी माझी जबाबदारी नाटक व नाटकाची टीम यांच्यापुरती मर्यादित होती. गेल्या सहा महिन्यांपासून याला व्यापक स्वरूप आले आहे. आधी माझ्यावर पन्नास लोकांची जबाबदारी होती, मात्र नाट्यपरिषदेचा अध्यक्ष या नात्याने आता मी पाचशे लोकांपर्यंत पोहोचलो आहे. या सर्वांच्या समस्या, सूचना ऐकून घेणे, त्यांचे व्यवस्थापन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे.

नाटकाचा परिणाम

मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक आहे. त्याची तुलना चित्रपटाशी करणे म्हणजे जिलेबीची तुलना तिच्या चित्राशी करण्यासारखे आहे. जिलेबीचा आनंद मिळवण्यासाठी ती खाल्लीच पाहिजे. चित्र पाहून भागणार नाही. नाटकाच्या तिकीटदराबाबत प्रेक्षकांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तिकीट काढणे म्हणजे कलावंतांचे कौतुक करणे आहे आणि त्याचवेळी कौतुकाला कलावंतांनी पात्र ठरले पाहिजे.

माझ्या प्रयोगाचा तिकीटदर हजार रुपये ठेवताना तेवढ्या रुपयांचे आपण काही देतो का, हा विचार नाट्यसंस्थांनी केला पाहिजे. ‘लाइव्ह परफॉर्मन्स’ची एक किंमत असते. घरात चित्रपट पाहताना आपण ‘जरा चहा आण,’ असं म्हणतो, तसं नाटक पाहताना म्हणू शकत नाही. इथं मनाच्या शांतीची किंमत आपण करू शकत नाही. नाटकाचं म्हणून एक अर्थकारण असतं.

(शब्दांकन - अश्विनी पवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com