जिंदादिली कोल्हापूरनं शिकवला स्वाभिमान...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

‘‘कोल्हापुरात जे जे काही शिकायला मिळालं. जो अनुभव मिळाला तो नक्कीच करिअरला वेगळा टर्निंग पॉईंट देणारा ठरला. एक गोष्ट मात्र नक्की आहे. या क्षेत्रात करिअर करायचे असेल आणि त्यासाठी जगभरात कुठेही गेलात तरी बदलत्या प्रवाहांना आत्मसात करावेच लागते. मात्र, त्यासाठी आपले ‘बेसिक’ पक्के लागते आणि ते हमखास पक्कं होतं ते कलापुरातच.’’

जिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे. जाहिराती, चित्रपटांच्या प्रमोशन्ससाठीची डिझाईन्स आम्ही बनवत असतो. नवनिर्मितीच्या या आनंदात कोल्हापूरनं दिलेली कलात्मक दृष्टी नेहमीच वेगळं काही तरी करण्याची प्रेरणा देत राहते...मुंबईतील ‘व्हीएमएलवाय’ कंपनीत सीनिअर डिझायनर म्हणून काम करणारा प्रतीक जोशी संवाद साधत असतो आणि त्यातून त्याचा एकूणच प्रवास उलगडत जातो. 

प्रतीक राहायला राजोपाध्येनगरात. शिक्षण झालं ते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आणि एस. एम. लोहिया कॉलेजमध्ये. त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूट आणि रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयात त्याचं कलाशिक्षण झालं. शाळेला असतानाच एकांकिकेत तो सहभागी होऊ लागला आणि त्यानिमित्तानं त्याची रंगमंचावर एंट्री झाली. पुढे संतोष शिंदे यांच्या सुगंध रंगकर्मी या संस्थेच्या माध्यमातून अभिनय प्रशिक्षण शिबिरातही सक्रिय होऊ लागला.

दळवीज्‌ आर्टस्‌ आणि कलानिकेतनच्या माध्यमातूनही तो सक्रिय होता. एकूणच बघता बघता त्यांचा कला क्षेत्रातील गोतावळा वाढला आणि दरम्यान शिक्षणही पूर्ण झालं. चार वर्षांपूर्वी त्यांनं मुंबई गाठायचं ठरवले. जॉबसाठी एका कंपनीच्या संपर्कात तो आला. या कंपनीनं त्याला एका ॲनिमेशनपटासाठी सलमान खानचं कार्टुन करायला सांगितलं. त्यानं ते करून पाठवलं आणि कंपनीतून तू ‘सिलेक्‍ट’ झाला असल्याचा फोन आला. इथूनच मग त्याचा मुंबईतील प्रवास सुरू झाला. पहिल्या दोन कंपन्यांतील अनुभवानंतर तो आता ‘व्हीएमएलवाय’ कंपनीत कार्यरत आहे.

तो सांगतो, ‘‘कोल्हापुरात जे जे काही शिकायला मिळालं. जो अनुभव मिळाला तो नक्कीच करिअरला वेगळा टर्निंग पॉईंट देणारा ठरला. एक गोष्ट मात्र नक्की आहे. या क्षेत्रात करिअर करायचे असेल आणि त्यासाठी जगभरात कुठेही गेलात तरी बदलत्या प्रवाहांना आत्मसात करावेच लागते. मात्र, त्यासाठी आपले ‘बेसिक’ पक्के लागते आणि ते हमखास पक्कं होतं ते कलापुरातच.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratik Joshi interview on Amhi Kolhapuri