esakal | 'कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला'; प्रवीण तरडे भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Tarde and Amol Dhawde

'कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला'; प्रवीण तरडे भावूक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनीसुद्धा त्यांचा जिवाभावाचा मित्र कोरोनामुळे गमावला आहे. अभिनेता अमोल धावडेच्या निधनानंतर प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. 'निर्व्यसनी, रोज व्यायाम करणारा, धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने खाल्ला', असं लिहित तरडेंनी त्याच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

प्रवीण तरडेंची पोस्ट:

माझा मित्र अमोल धावडे गेला. कोरोनाने आज एक निर्व्यसनी, रोज व्यायाम करणारा, धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात खाल्ला. किती आठवणी? १९९६ साली मी लिहिलेल्या 'आणखी एक पुणेकर' या एकांकिकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचो. देऊळबंद, मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच. ११ मे ला अमोलचा वाढदिवस म्हणून तिन्ही सिनेमांचं डबिंग आतापर्यंत त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅागने सुरू करायचो. हा माझा एक श्रध्देचा भाग होता. खूप मोठा बांधकाम व्यावसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकला, तेव्हा तू कडकडून मारलेली मिठी कशी विसरू रे मित्रा. एकत्र नॅशनल खेळलो, एकांकिका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास. तुझा शेवटचा मेसेज होता, "बाय बाय प्रविण, बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव". राहिलाच शेवटी. डोळ्यातील पाणी थांबत नाहीये रे आमल्या. जिथे कुठे असशील सुखी राहा, नाही तरी मी आणि पिट्या तुला 'सुखी जीव' असंच म्हणायचो की. सुखी राहा, कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा!', अशा शब्दांत प्रवीण तरडेंनी भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : 'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधला 'शिऱ्या' बनलाय कोविड वॉरिअर

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ६६,१९१ रुग्णांची नोंद झाली असून ८३२ जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन मृतांचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

loading image
go to top