
प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास दाखविणारा खास ‘तरडे पॅटर्न’चा हा सिनेमा असेल. या सिनेमाच्या पोस्टरपासून त्यातील स्टारकास्ट, लोकेशन्स आदींबद्दल तरडे यांच्याशी मारलेल्या गप्पा...
सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया?
- सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर ते व्हायरल होणे आणि प्रेक्षकांना आवडणे, ही गोष्ट कोणत्याही सिनेमासाठी महत्त्वाची असते. रसिक प्रेक्षकांना पोस्टर किती आवडते, यावरच चित्रपटाचे यश ठरते. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर ते व्हायरल होण्याचा आनंद वेगळाच आहे.
सध्या ऐतिहासिक सिनेमे तयार करण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’च्या निर्मितीमागची संकल्पना काय?
- खरेतर ऐतिहासिक सिनेमे तयार करण्याचा ट्रेंड पूर्वीपासूनचा आहे. आपली सिनेमासृष्टी जगली ती ऐतिहासिक सिनेमांवरच! मधल्या काळात तो ट्रेंड कमी झाला होता. पण, आता चित्र बदलते आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मालिका, दीपा लांजेकर यांचे सिनेमे आणि हिंदीत चांगली कामगिरी केलेला ओम राऊत ही उदाहरणे आहेत. ओमच्या ‘तान्हाजी’ने थेट ३०० कोटींचा पल्ला गाठला, याचा अभिमान वाटतो. मराठी माणूस इतिहासावर पहिल्यापासून प्रेम करत आला आहे. त्याची सर्व पुण्याई छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याकडे जाते. ही दोन दैवी व्यक्तिमत्त्वे लोकांच्या कायमची स्मरणात आहेत.
ऐतिहासिक सिनेमा तयार करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?
- सर्वप्रथम भांडवल! एखादा साधा आणि ऐतिहासिक चित्रपट, यांतील मोठा फरक भांडवलाचाच असतो. सिनेमाचे निर्माते संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, देवेंद्र बोरा यांचीच हा सिनेमा तयार करण्याची संकल्पना होती. आव्हान झेलण्याचे सर्व यश त्यांचे आहे. या तिघांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आम्ही सर्वच धडपड करीत आहोत.
ऐतिहासिक सिनेमांवर घडलेल्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप होतो, त्यावर तुमचे काय मत आहे?
- इतिहासामध्ये जे घडले तेच दाखवावे. त्यामध्ये तोडमोड करू नये. शिवाजी महाराजांनी ३७८ किल्ले उभारले. ते अख्खा महाराष्ट्र घोड्यावरून फिरले. यामध्ये कोणताही बदल, छेडछाड करू शकत नाही. इतिहास घडून गेलाय, तो भव्यदिव्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.
‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा दोन वर्षे अभ्यास करून केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघांचेही राज्याभिषेक हंबीरराव मोहिते यांनी पाहिले. हंबीरराव यांचा बराचसा काळ हा संभाजी महाराजांसोबत गेला. संभाजी महाराजांचे शौर्य, लढण्याची पद्धत, राज्यकारभार चालविण्याची पद्धत आणि शिवाजी महाराजांसारखाच व्यापक दृष्टिकोन, असा इतिहास सिनेमात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
सिनेमात काय वेगळेपण आहे?
- इतिहास दाखविताना त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती दिली जात नाही. हंबीरराव मोहिते यांच्या लढाया सर्वांना माहीत आहेत. पण, त्यांच्या घरचे जगणे आणि परिवाराविषयी प्रेक्षकांना फारच कमी माहीत असेल. एकूणच, मोहिते परिवाराचा स्वराज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सिनेमात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिनेमात माझ्याबरोबरच मोहन जोशी, गश्मीर महाजनी, सुनील पलवल, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, श्रुती मराठे, देवेंद्र गायकवाड, स्नेहल तरडे आणि क्षितिज दाते ही स्टारकास्ट आहे.
तुम्ही लोकेशनला प्राधान्य देता की ‘व्हीएफएक्स’ला?
- महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक विलक्षण आणि उत्तम ठिकाणे आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकेशन्स वापरण्यावर आम्ही भर दिला. गरज पडेल तेथेच व्हीएफएक्स मदत घेतली.
या सिनेमात प्रवीण तरडे यांचा कोणता ‘पॅटर्न’ पाहायला मिळेल?
- माझ्या प्रत्येक सिनेमात एक प्रकारची आगळीक असते, राकटपणा असतो. मराठ्यांचा राकटपणा, रांगडेपणा हीच ओळख होती. इतिहासही तेच सांगतो. त्यामुळे आगळीक, माझा स्वभाव आणि खास स्टाईल प्रेक्षकांना यातून पाहायला मिळेल.
मनोरंजन