esakal | 'मोठ्या बहिणीमुळं कुठं काम मिळालं नाही...'

बोलून बातमी शोधा

priyanka chopra cousin meera chopra
'मोठ्या बहिणीमुळं कुठं काम मिळालं नाही...'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवू़डमध्येही आपल्या नावाच्या दबदबा तयार करणारी अभिनेत्री म्हणून प्रियंका चोप्राची ओळख आहे. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारुन एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. तिची निर्मिती आणि भूमिका असलेला द व्हाईट टायगर हा ऑस्करच्या शर्यतीत होता. मात्र त्याला ऑस्कर मिळू शकले नाही. प्रियंका सोशल मी़डियावर कायम चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिच्या नावाची सतत चर्चा होत असते. आताही ती चर्चेत आली आहे ते तिच्या बहिणीनं केलेल्या आरोपांमुळे.

प्रियंकाची बहिण मीरा चोप्रानं एक मोठा आरोप प्रियंकावर केला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सध्या प्रियंकाला तिच्या चाहत्यांनीही प्रश्न विचारला आहे. मीरानं अशाप्रकारचा आरोप का केला आहे हा खरा मुद्दा असल्याचेही एका चाहत्यानं म्हटलं आहे. मला आतापर्यत माझ्या मोठ्या बहिणीमुळे काम मिळालं नाही असा सणसणीत आणि तितकाच धक्कादायक आरोप प्रियंकावर केला आहे. मीरानं झुम टीव्हीवर दिलेल्या एका मुलाखतीत असे सांगितले आहे की, मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तेव्हा एकच चर्चा होती. ती म्हणजे मी प्रियंका चोप्राची बहीण आहे. त्यामुळे नंतर मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

मीराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तिनं 2014 मध्ये गँग ऑफ घोस्ट्समधून बॉलीवूडध्ये इंट्री केली होती. याशिवाय तिनं तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसेच सध्या द टॅटू मर्डर्स मधूनही तिनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा तो अंदाज प्रेक्षकांना भावला आहे. त्या शो मध्ये मीरानं एका पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे. असे असतानाही मीराला मोठ्या प्रमाणावर बॉलीवूडमध्ये यश मिळवता आले नाही. तिला तिच्या बहिणीमुळे कुठेही काम मिळालेले नाही असेही तिनं सांगितले आहे.

त्या मुलाखतीत मीरानं सांगितलं आहे की, मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले त्यावेळी एकच चर्चा होती ती म्हणजे मी प्रियंका चोप्राची बहिण आहे. मात्र खरं सांगायचे झाल्यास, मला तुलना करायला आवडत नाही. एखादया निर्मात्याला भलेही मला कास्ट करायचे असेल तरीही त्यानं मला कास्ट केलं नाही याचे कारण म्हणजे मी प्रियंकाची बहिण आहे. हेही खरं आहे की, प्रियंकाची बहिण असणं हे माझ्या करिअरसाठी कुठेही महत्वाचे ठरलेलं नाही.