esakal | तोकडे कपडे घालून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचं प्रकरण; प्रियांकाने आता मांडली तिची बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra and modi

तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा 'त्या' घटनेवर झाली व्यक्त

तोकडे कपडे घालून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचं प्रकरण; प्रियांकाने आता मांडली तिची बाजू

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री प्रियांका चोप्राने २०१७ मध्ये बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान प्रियांकाने घातलेल्या तोकड्या ड्रेसवरून मोठा वाद निर्माण झाला होता. देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जाताना असे तोकडे कपडे घालणे योग्य आहे का, असा सवाल तिला नेटकऱ्यांनी विचारला होता. पण त्यावेळी प्रियांकाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या वादावर आता प्रियांकाने 'अनफिनिश्ड' या पुस्तकात तिची बाजू मांडली आहे. या पुस्तकात तिने तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. 

काय होतं प्रकरण?
२०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनी दौऱ्यावर गेले होते. त्याचवेळी अभिनेत्री प्रियांका तिच्या 'बेवॉच' या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी तिथे गेली होती. प्रियांकाने मोदींची भेट घेतली आणि या भेटीदरम्यानचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र नेटकऱ्यांनी तिला तिच्या ड्रेसवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. 

हेही वाचा : कंगनाचा ट्विटरशी पंगा; आता या अॅपवर असेल तिचं नवीन अकाऊंट

प्रियांकाने मांडली तिची बाजू
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी त्यावेळी एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. मी त्यांच्या कार्यालयात संपर्क साधून त्यांच्याशी भेट घेण्याची विनंती केली होती. त्यावेळी अमेरिकेतील प्रचारक आणि भाऊ यांच्यासोबत मी मोदींना भेटले आणि या भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. माझ्या 'बेवॉच' या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा सुरू होतं आणि त्यामुळे मी तो ड्रेस घातला होता', असं प्रियांकाने तिच्या पुस्तकात नमूद केलं. 

हेही वाचा : करिना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

प्रियांकाच्या आईनेही दिलं होतं स्पष्टीकरण
प्रियांकाच्या ड्रेसवरून वाद झाला तेव्हा प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीसुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं. "प्रियांकाने पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान केले होते. तिचे इतर कार्यक्रम आधीच ठरलेले होते, त्यामुळे तिला कपडे बदलायला वेळ मिळाला नाही. शिवाय ती ड्रेस बदलून साडी नेसण्यासाठी त्यांच्याकडे अधिक वेळ मागू शकत नाही", असं त्यांनी म्हटलं होतं. 

प्रियांकाने त्यावेळी ट्रोलर्सना जरी कोणती प्रतिक्रिया दिली नसली तरी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तिने आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्येही तिने तोकडे कपडे परिधान केले होते. 'लेग्ज फॉर डेज' असं कॅप्शन देत तिने ट्रोल करणाऱ्यांना खोचक उत्तर दिलं होतं.