‘मास्टर’चा बॉलीवूड अवतार येणार; 'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी घेतले हक्क

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची सतत वाढणारी लोकप्रियता पाहिल्यानंतर त्या  चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई - लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील फार थोड्या चित्रपटांना यश मिळाले. अनेकांना मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले. दाक्षिणात्य मास्टरची गोष्ट वेगळी होती. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 40 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. त्याच्याकडून आणखी कमाईची अपेक्षा आहे. एवढी कमाई केल्यानंतर त्याच्याकडे बॉलीवूडचे लक्ष गेले नसते तर नवल म्हणता आले असते. सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या सर्वांच्या पसंतीस पडणारा मास्टर आता बॉलीवूडच्या अवतारात दिसणार आहे.

या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची सतत वाढणारी लोकप्रियता पाहिल्यानंतर त्या  चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार  मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी 'मास्टर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबादला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते.

कोरोनामुळे चित्रपट व्यवसायावर अनेक बंधने आली होती. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. आता वेगवेगळ्या राज्यांनी चित्रपट व्यवसाय़ाला चालना देण्यासाठी चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही असे असताना बॉलिवूडमधील निर्माते चित्रपट प्रदर्शित करणे टाळत आहेत. तामिळनाडूतही निम्म्या प्रेक्षकसंख्येवर चित्रपटगृहे सुरू असली तामिळ अभिनेता थलपती विजयचा चित्रपट 'मास्टर’ केवळ प्रदर्शितच झाला असे नव्हे तर त्याने पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम केला. जगभरात या चित्रपटाने 53 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.

 ‘मास्टर’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंडही मोडला. बुधवार, 13 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. याचा चांगला फायदा झाला. कारण, अनेक भागांत 13 ते 15 जानेवारीदरम्यान लोहडी, मकरसंक्रांत, पोंगलसारख्या सणाचा उत्साह होता. त्यानंतर 16 जानेवारीला शनिवार व 17 ला रविवार आहे. याचा फायदा चित्रपटाला होणार आहे.

 'पौरशपूर पाहू नये अशी, निव्वळ भंपक; रटाळवाणी मालिका'

तामिळनाडूत निम्म्या प्रेक्षकसंख्येवर चित्रपटगृहे सुरू आहेत. मात्र तरीदेखील 'मास्टर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम केला. चित्रपटाने केवळ तामिळनाडूत पहिल्या दिवशी 25 कोटी कमावले.देशभरात सुमारे 42 कोटींचा व्यवसाय केला. परदेशातही पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली. केवळ ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवशी 2.48 लाख डॉलर (1.82 कोटी) कमाई झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: producer of Kabir Singh movie make Hindi version of south master movie