पुनीत राजकुमार यांनी मृत्यूनंतर चौघांना दिली दृष्टी

वयाच्या ४६व्या वर्षी पुनीत यांनी घेतला जगाचा निरोप
Puneeth Rajkumar
Puneeth Rajkumar file view

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं वयाच्या ४६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं बेंगळुरूमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. शुक्रवारी सकाळी जिममध्ये असताना पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना लगेचच बेंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूनंतरही पुनीत यांनी चार जणांना दृष्टी दिली आहे.

पुनीत राजकुमार यांनी नेत्रदान करणार असल्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार त्यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात आलं. नारायण नेत्रालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत राजकुमारांच्या नेत्रदानामुळे चार तरुणांना दृष्टी मिळाली आहे. ३ पुरुष आणि एका महिलेला नेत्र प्रत्यारोपण करण्यात आलं. नारायण नेत्रालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. भुजंग शेट्टी याविषयी म्हणाले, "पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या नेत्रदानाबद्दल आम्ही खूप भाग्यवान आणि कृतज्ञ आहोत. विशेष म्हणजे डोळ्याच्या कॉर्नियाच्या वरच्या आणि आतील थरांना वेगळे करून त्याद्वारे आम्ही दोन रुग्णांवर उपचार करू शकलो. त्यामुळे चौघांना दृष्टी मिळाली."

Puneeth Rajkumar
शहनाजच्या गाण्यात सिद्धार्थच्या आठवणी; चाहते भावूक

"कॉर्नियाचा वरचा थर हा सुपरफिशिअल कॉर्निअल असलेल्या दोन रूग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आला. तर आतील थर हा एंडोथेलियल किंवा डीप कॉर्नियल लेयर रोग असलेल्या रूग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आला. म्हणून, चार वेगवेगळ्या रूग्णांना दृष्टी मिळू शकली. आमच्या माहितीनुसार आतापर्यंत कर्नाटकात असा प्रयोग केला गेला नव्हता", असं डॉ. शेट्टी म्हणाले. २९ ऑक्टोबर रोजी पुनीत यांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या भावाने नारायण नेत्रालयाला संपर्क केला. त्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली.

पुनीत हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होते. बालकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीस सुरुवात केली. कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारे ते कलाकार होते. चाहत्यांमध्ये ते अप्पू या नावाने ओळखले जात होते. अचानक छातीत दुखू लागल्याने पुनित यांना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बेंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्याच्या काही काळानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com