गायनात करिअर कराचंय...

तेजल गावडे  
शनिवार, 17 जून 2017

"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटातील गण्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखवणारा बालकलाकार पुष्कर लोणारकरचा नुकताच "चि. व. चि.सौ.कां' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात त्याने साकारलेल्या "टिल्ल्या' या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. आता येत्या शुक्रवारी त्याचा टी टी एम एम' (तुझं तू माझं मी) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत... 

"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटातील गण्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखवणारा बालकलाकार पुष्कर लोणारकरचा नुकताच "चि. व. चि.सौ.कां' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात त्याने साकारलेल्या "टिल्ल्या' या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. आता येत्या शुक्रवारी त्याचा टी टी एम एम' (तुझं तू माझं मी) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत... 

मूळचा पंढरपूरचा असलेला पुष्कर लोणारकर सध्या नवव्या इयत्तेत शिकतोय. त्याला अभिनयाची थोडीफार आवड बालपणापासून होती. शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात अफझल खानची भूमिका त्याने केली होती. त्याच्या अभिनयाची पंढरपूरमध्ये सगळ्यांनी खूप प्रशंसा केली होती. त्याला "एलिझाबेथ एकादशी' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली? असे विचारल्यावर तो म्हणाला की, दिग्दर्शक परेश मोकाशी यांना वारीवर आधारित चित्रपट बनवायचा होता आणि त्यांना वारीबद्दल माहीत असणारे बालकलाकार हवे होते. त्यामुळे ते आमच्या शाळेत आले होते. माझ्या शाळेतील शिक्षकांनी माझे नाव त्यांना सुचवले. त्यांनी माझी ऑडिशन घेतली आणि दोन दिवसांनंतर फोन करून सांगितले की, "तुझी "एलिझाबेथ एकादशी' चित्रपटासाठी निवड झालीय.' या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटानंतर माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर मी श्रेयस तळपदे यांच्यासोबत "बाजी' चित्रपटात काम केलं. मग, "रांजण' चित्रपट केला. पुन्हा एकदा परेश सरांबरोबर "चि. व. चि.सौ.कां' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यातील माझ्या टिल्ल्या या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतुक झाले. परेश मोकाशींबद्दल सांगताना तो म्हणाला की, मी परेश मोकाशी सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. या क्षेत्रातील ते माझे गुरू आहेत. त्यांनी माझ्याकडून खूप चांगले काम करून घेतले. त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. 
आता पुष्करचा "टी टी एम एम' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यातील भूमिकेबद्दल पुष्कर म्हणाला, यात मी नेहा महाजनच्या भावाची भूमिका साकारलीय. हा भाऊ बहिणीला त्रास देणारा आणि खोड्या काढणारा आहे; पण त्याचे बहिणीवर खूप प्रेम आहे. त्याला वाटत असते की बहिणीचे लग्न व्हावे. तिच्याबाबतीत तो खूप भावनिक आहे. मी रुपेरी पडद्यावर भावनिक झालेलो पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे माझा हा अंदाज प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करतो. 

"टी टी एम एम' चित्रपटातील अनुभव खूप छान होता, असे पुष्कर म्हणाला आणि पुढे सांगू लागला की यात सगळे तरुण कलाकार आहेत. दिग्दर्शक कुलदीप दादाची पात्र मांडण्याची पद्धत खूप चांगली आहे. प्रत्येक पात्र कसे असले पाहिजे, हे तो खूप सुंदर पद्धतीने सांगतो. तू एकाच साच्यातील भूमिका साकारताना दिसतोस, असे म्हटल्यावर पुष्करने सांगितले. असे नाहीये. मला तशा भूमिका व तसे संवाद मिळत गेले. "एलिझाबेथ एकादशी'मध्ये गण्या शिव्या देताना दिसतो; पण त्या तशा वाईट अर्थाने दिलेल्या शिव्या नाहीत, तर "चि. व चि.सौ.कां'मधील माझे संवाद कुणा मोठ्या व्यक्तीच्या तोंडून ऐकायला मजा आली नसती. मोठ्यांचे वाक्‍य एका लहान मुलाच्या तोंडी ऐकून प्रेक्षकांना खूप धमाल आली. सुदैवाने तशा भूमिका आणि संवाद मिळत गेले. "रांजण' चित्रपटात माझी मुख्य भूमिका नव्हती. तरी मी प्रकाशझोतात आलो. 
भूमिकेची तयारी कशी करतो, याबद्दल त्याने सांगितले की, माझ्या आतापर्यंतच्या जास्त भूमिका या गावाकडील असल्यामुळे मला जास्त तयारी करावी लागली नाही. थोडीशी मस्ती अंगात होतीच. आपली भूमिका लोकांना खरी वाटली पाहिजे, असे मला वाटते. "एलिझाबेथ एकादशी', "बाजी' व "रांजण' या तिन्ही चित्रपटांतील भूमिकेची शैली वेगवेगळी आहे. भूमिकेसाठी आधी मी काहीही तयारी करत नाही. फक्त दृश्‍य साकारताना काळजी घेतो. 

तू अभ्यास व चित्रीकरण याचा समतोल कसा साधतोस, त्यावर तो म्हणाला की, "ज्या वेळी चित्रीकरण करीत असतो तेव्हा मी माझे पूर्णपणे लक्ष चित्रपटाकडे केंद्रित करतो. चित्रीकरण आणि इतर काम आटोपल्यानंतर घरी जायला निघालो की मी कामाबाबत विसरून जातो आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो.' 

मी अद्याप कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते ठरविलेले नाही. माझा गायनात करिअर करण्याचा विचार आहे. मी कविता करतो आणि गातोही. मी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतोय. पुष्करला अभ्यास आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात भरभरून यश मिळो ही सदिच्छा. 

मला कधीच वाटले नव्हते की तो अभिनय क्षेत्रात काम करेल. प्राथमिक शाळेत असताना स्नेहसंमेलनात अभिनय करायचा; पण त्याची आवड ही इथपर्यंत मजल मारेल असे कधीच वाटले नव्हते. हा खूप चांगला योगायोग ठरला की परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी यांचा परीसस्पर्श पुष्करला लाभला आणि "एलिझाबेथ एकादशी'पासून त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला. 

- प्रमोद लोणारकर (पुष्करचे वडील)

Web Title: pushkar lonarkar interview