'तुझ्या पुस्तकापेक्षा माझा चित्रपट चांगला'; माधवन-चेतन भगत यांच्यात ट्विटरवॉर | R Madhavan Vs Chetan Bhagat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Bhagat and R Madhavan

'तुझ्या पुस्तकापेक्षा माझा चित्रपट चांगला'; माधवन-चेतन भगत यांच्यात ट्विटरवॉर

प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) आणि अभिनेता आर. माधवन (R Madhavan) यांच्यामध्ये नुकतंच ट्विटरवॉर रंगल्याचं पहायला मिळालं. 'चित्रपट विरुद्ध पुस्तकं' या प्रश्नाचं उत्तर देण्यावरून हा वाद सुरू झाला. "तू कधी कोणाला असं म्हणताना ऐकलं आहेस का की चित्रपट पुस्तकापेक्षा चांगला आहे", असा प्रश्न चेतन यांनी विचारला. त्यावर माधवन म्हणाला, 'होय, थ्री इडियट्स'! (3 Idiots) या चित्रपटात माधवनने इंजिनीअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती आणि चेतन यांच्या 'फाइव्ह पॉईंट समवन' या पुस्तकावर चित्रपटाची कथा आधारित होती. पुस्तक आणि चित्रपटांविरुद्ध हा वाद इथेच थांबला नाही.

माधवनची 'डीकपल्ड' ही वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. यामध्ये त्याने लेखकाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे यामध्ये चेतन यांनीसुद्धा भूमिका साकारली आहे. 'जर तुला पुस्तकं इतकी आवडतात तर मग तू डीकपल्डमध्ये अभिनय का केलास', असा प्रश्न माधवनने विचारला. त्यावर उपरोधिक उत्तर देताना चेतन म्हणाले, 'हाहाहाहा, मी पान मसाला ब्रँडच्या अवॉर्ड शोपेक्षा पुलित्झर पुरस्काराला प्राधान्य देतो.' माधवननेही प्रत्युत्तर देताना म्हटलं, 'मी बेस्टसेलरपेक्षा ३०० कोटी क्लबला प्राधान्य देतो.'

हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असं काही..

चित्रपट विरुद्ध पुस्तकांचा वाद पुढे भूमिकांपर्यंत पोहोचला. 'एका चित्रपटातील फरहान या नावापेक्षा लोकांनी मला माझ्या खऱ्या नावाने ओळखणं मी अधिक पसंत करेन', असा टोला चेतनने लगावला. यावर माधवननेही अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं. 'मी फक्त फरहान नाही, मी तनू वेड्स मनूमधला मनू आहे, अलयपयुथेमधला कार्तिक आहे, रहना है तेरे दिल मै मधला मॅडी आहे. कारण मी सर्वांच्या हृदयात राहतो', असं तो म्हणाला. अखेर चेतन यांनी नमतं घेत वाद मिटवला. 'जर तुझी ही लेखी परीक्षा असती तर मी म्हणेन तू नक्कीच पास झालास', अशा शब्दांत त्यांनी माधवनचं कौतुक केलं.

Web Title: R Madhavan Says 3 Idiots Was Better Than The Book Chetan Bhagat Hits Back Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..