मुलासाठी आर माधवनने घेतला मोठा निर्णय; पत्नीसह दुबईत झाला शिफ्ट | R Madhavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor R Madhavan with his son Vedaant

मुलासाठी आर माधवनने घेतला मोठा निर्णय; पत्नीसह दुबईत झाला शिफ्ट

बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्स आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहेत. तर काही स्टारकिड्स पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. इंडस्ट्रीत असेही काही स्टारकिड्स आहेत, जे अभिनयाशिवाय वेगळ्याच क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांतने (Vedaant) स्विमिंगमधील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. ऑक्‍टोबरमधील ज्युनियर नॅशनल अ‍ॅक्‍वाटिक चॅम्पियनशिप २०२१ यासह अनेक पदकं जिंकून १६ वर्षीय वेदांतने आपलं नाव कमावलंय. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. मुलाच्या याच स्वप्नासाठी आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. वेदांतला ऑलिम्पिकसाठी तयारी करता यावी यासाठी आर माधवन पत्नी आणि मुलासह दुबईला राहण्यासाठी गेला आहे. "कोविडच्या भीतीमुळे भारतात मोठे स्विमिंग पूल बंद आहेत आणि प्रशिक्षणासाठी सुविधा नसल्यामुळे वेदांतच्या 2026 च्या ऑलिम्पिक तयारीला अडथळा येऊ नये म्हणून कुटुंबाने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला," असं माधवनने सांगितलं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधवन म्हणाला, "मुंबईतील काही मोठे स्विमिंग पूल हे कोविडमुळे बंद आहेत आणि काही फारच लांब आहेत. आम्ही दुबईत वेदांतसोबत आहोत आणि इथे त्याला मोठ्या स्विमिंग पूलमध्ये प्रवेश मिळाला आहे. तो ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे आणि सरिता आणि मी त्याच्या पाठीशी आहोत. तो जगभरातील स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावतोय आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे." आपल्या मुलाने अभिनेता व्हावं असं आम्हाला कधीच वाटलं नाही, असं त्याने सांगितलं.

हेही वाचा: जॉन अब्राहमच्या संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

वेदांतचं देशासाठी स्वप्न-

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत वेदांत पोहण्याच्या आवडीविषयी म्हणाला, "लहानपणापासून मला पोहण्याची आवड आहे. या आवडीमुळेच शाळेत मी जलतरण संघात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या संघातून मी विविध स्पर्धेत भाग घेऊ लागलो. गेल्या चार वर्षांपासून मी विविध जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेतोय. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचं माझं स्वप्न आहे. त्या ध्येयासाठी मी रोज काम करतोय आणि माझ्या मनात सध्या ती एकच गोष्ट आहे."

बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या ४७व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने सातवं पदक जिंकलं होतं. वेदांतने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ४ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकले आहेत. त्याच्या या यशावर नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Web Title: R Madhavan Shifts To Dubai With His Wife For Son Vedaants Big Dream

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentr madhavan