चंदेरी दुनियेत झळकताहेत आजऱ्यातील ‘तारका’

रणजित कालेकर
Tuesday, 2 July 2019

एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज जगभरातील शंभर महिला डीजेमध्ये स्वतःचे नामांकन मिळवले आहे.

कोल्हापूर -  एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज जगभरातील शंभर महिला डीजेमध्ये स्वतःचे नामांकन मिळवले आहे. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि प्रादेशिक सीमांना स्वतःचे बंधन न मानता त्यावर मात करत आजऱ्याच्या दोघी कन्या आज आपापल्या क्षेत्रात आपले, कुटुंबाचे आणि आजऱ्याचे नाव चमकवत आहेत.

आजरा तालुक्यातील पेरणोली येथील पांडुरंग देसाई यांची मुलगी पूर्वाश्रमीची वंदना व स्वाती या नावाने ओळखली जात असे. सध्या तिची ‘रावी किशोर’ या नावाने फिल्म इंडस्ट्रीजमध्ये ओळख आहे. आजरा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागातून ती पुढे आली. लग्नानंतर मुंबई आणि तिथून गोव्याला आल्यावर गोवा कला अकादमीच्या रेपट्री कंपनीत तिची निवड झाली. येथे मराठी व कोकणी नाटके सादर केली. मुंबई विद्यापीठामध्ये २०१७ मध्ये नाट्यशास्त्र विषयात तिने एमए केले. नुकतीच तिने कोकणी व मराठीतील ‘द स्टेअरिंग’ चित्रपटात नायिकेची भूमिका केली आहे. मल्याळी भाषा शिकल्यामुळे स्टार वाहिनीसाठी एक टीव्ही शो तेलगू भाषेत केला.

दरम्यान, मल्याळम सिनेमासाठी ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड झाली. हा सिनेमा सुरू होण्यापूर्वी तिला ‘मोडस ऑपरेडी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या ऑगस्टमध्ये तो केरळमध्ये प्रदर्शित होईल. सध्या ती दोन मल्याळम सिनेमा, वेबसिरीज व एक मल्याळम व्हिडीओ गीत करत आहे. गोवा कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठात तिने ११ नाटकांत प्रमुख भूमिका साकारल्या असून ही नाटके कोकणी, मराठी, हिंदी आणि ऊर्दू भाषेतील आहेत.

आजरा शहरातील प्रकाश डोणकर व स्वाती डोणकर या कापड व्यावसायिकांची मुलगी श्रेया डोणकर. बालपणापासून तिला चंदेरी दुनियेची आवड होती. शिक्षणाबरोबरच कलेच्या क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न राहिला आहे. यासाठी तिला तिच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले. आजऱ्यातील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतले. लहानपणापासून हुशार असलेल्या या मुलीने लग्नानंतर डीजे (डिस्क जॉकी) हे करिअरचे क्षेत्र निवडले. तिचे प्रयोग देश-विदेशात होत आहेत. नुकत्याच अमेरिकन संस्थेतर्फे झालेल्या जगातील अव्वल शंभर महिला डीजेमध्ये तिला स्थान मिळाले असून जगभरातून सर्वोत्कृष्ट महिला डीजे निवडीकरिता नामांकन मिळाले आहे. भारतातून निवड झालेल्या महिला डीजेमध्ये ती एकमेव आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raavi Kishor and DJ Shreya Donkar success story