दिल, दोस्ती : सुपरहिट म्युझिकल बॉण्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल, दोस्ती : सुपरहिट म्युझिकल बॉण्ड

दिल, दोस्ती : सुपरहिट म्युझिकल बॉण्ड

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे गेली अनेक वर्षं आपल्या गायकीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे आहे. प्रियांका बर्वे आजच्या तरुण पिढीतील एक आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. या दोघांच्या म्युझिकल बॉण्डिंगचा चाहतावर्ग मोठा आहे. राहुल आणि प्रियांका यांची पहिली भेट दहा-अकरा वर्षांपूर्वी ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकाच्या निमित्तानं झाली. राहुल यांनी प्रियांकाची ऑडिशन घेतल्यावर या नाटकातील रेवती या पात्रासाठी प्रियांकाचं नाव निश्चित झालं. तेव्हापासून यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला.

प्रियांका म्हणाली, ‘‘राहुल मला मोठ्या भावासारखाच असल्यानं मी त्याला दादा म्हणते. आमचं नातं खूप खास आहे. आधी तो माझा भाऊ आहे, मग मित्र आहे आणि मार्गदर्शक आहे. तो मला गुरुस्थानी आहे. इतकी वर्षं त्याच्याबरोबर काम करून मी खूप गोष्टी शिकले. तो अत्यंत वक्तशीर आहे. दिलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच तो ठरलेल्या ठिकाणी हजर असतो. त्याचा हा गुण मला आत्मसात करायला आवडेल. बोलण्याच्या बाबतीत तो पुणेरी आहे. त्याच्या जे मनात असतं तेच तो बोलतो. शास्त्रीय गायनामध्ये त्याचं मोठं नाव आहेच, पण त्याला वेगवेगळे गायनप्रकार खूप आवडतात. तो सतत वेगळ्या शैलीतली गाणी गात स्वतःला चॅलेंज करत असतो. त्याच्या यू-ट्यूब चॅनेलच्या निमित्तानं त्याच्यातला एक वेगळा पैलू आपल्याला बघायला मिळाला. पण त्याचं शास्त्रीय गायन मला विशेष आवडतं. तो माझं कधीही खोटं कौतुक करत नाही. माझं काही चुकल्यास हक्कानं तो माझा कान पिळतो. पण तितकीच हक्कानं माझी चेष्टा मस्करीही करतो. त्याच्या या स्वभावामुळं त्याच्याबरोबर काम करताना नेहमीच खूप मजा येते.’’ राहुल देशपांडे यांच्या बहुप्रतिक्षित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी प्रियांकानं ‘बिंदिया ले गई’ ही ठुमरी गायली आहे. तिनं सांगितलं, ‘‘ठुमरी गाण्याची ही माझी पहिलीच वेळ. वसंतराव देशपांडे यांची गायकी अजिबात सोपी नाही. दोन दिवसात आम्हाला ती रेकॉर्ड करायची नव्हती. कारण ती गळ्यात मुरणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी राहुल दादानं माझ्याकडून खूप मेहनत करून घेतली आहे. दोन महिने आम्ही मिळून त्याचा रियाज करत होतो. त्यामुळं मला खूप काही शिकवून जाणारा हा अनुभव होता.’’

राहुल यांनी प्रियांकाबद्दल बोलताना सांगितलं, ‘‘प्रियांका अतिशय प्रामाणिक आणि प्रांजळ आहे. तिच्यात एक लहान मूल आहे व ते अद्याप जिवंत आहे. त्यामुळं ती काही ना काही वेडेपणा करत असते. पण अर्थात, त्या वेडेपणाचा त्रास होत नाही. तिच्या अशा हसऱ्या खेळत्या स्वभावामुळं ती जिथं असेल तिथलं वातावरण कायम आनंदी असतं. इतक्या वर्षांमध्ये मी कधीही तिच्याकडं एक सहकलाकर म्हणून पाहिलं नाही. माझ्यासाठी ती माझी धाकटी बहीण आहे किंवा माझी छोटी मैत्रीण आहे. ती खूप जिद्दी आहे, खूप मेहनती आहे. आपल्याला काय ध्येय साध्य करायचंय हे तिला पक्क माहीत आहे आणि त्यासाठी जे लागतील ते प्रयत्न ती करते. तिनं आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत, पण ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी तिनं गायलेली ‘बिंदिया ले गई’ ही ठुमरी मला खूप आवडली. ती ठुमरी गायला फार कठीण आहे. प्रियांकानं त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि अतिशय उत्तम गायली आहे. तिला सारखं नवनवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असते. मी तिला एखादी गोष्ट सांगितली की ती पटकन तिच्या गळ्यातून येते. विशेष म्हणजे, ती तिच्या लक्षात राहते आणि कार्यक्रमाच्या वेळी ती जागा तिच्याकडून आवर्जून गायली जाते. हा तिच्यातला नैसर्गिक गुण आहे असं मला वाटतं. म्हणून मीही तिला नवीन काही शिकवणं खूप एन्जॉय करतो.’’

अशाप्रकारे एकमेकांबरोबर हसत खेळत काम करत त्यांच्या म्युझिकल बॉण्डसारखाच त्यांच्या मैत्रीचा बॉण्डही घट्ट झाला आहे.

(शब्दांकन ः राजसी वैद्य)

Web Title: Rahul Deshpande Priyanka Barve Music Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..