
काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईचा थरार (नवा चित्रपट : रेड)
देशामध्ये ऐंशीच्या दशकात पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या सर्वांत मोठ्या कारवाईची गोष्ट सांगणारा 'रेड' हा अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट वेगवान आणि खिळवून ठेवणार आहे. अजयबरोबर सौरभ शुक्ला आणि एलिना डिक्रूझचा अभिनय चित्रपटाला अधिक देखणा बनवतात. काही प्रसंगांची पुनरावृत्ती, कथेचा ओघ कमी करणारी गाणी आणि मेलोड्रामाचा अतिरेकी वापर या त्रुटी आहेत.
'रेड'ची कथा 1981मध्ये लखनौमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित आहे. प्रामाणिक आणि धडाकेबाज इन्कमटॅक्स ऑफिसर अमेय पटनायक (अजय देवगण) आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळं अनेक बदल्यांचा सामना करीत शहरात दाखल झाला आहे. त्याची पत्नी मालिनी (एलिना डिक्रूझ) अमेयच्या कार्यपद्धतीला कायमच प्रोत्साहन देते. शहरात दाखल होताच त्याला आमदार रामेश्वर सिंग ऊर्फ ताऊजी (सौरभ शुक्ला) यांनी जमा केलेल्या काळ्या पैशाची माहिती मिळते. निनावी फोनद्वारे अमेयला ही माहिती पुरवली जात असते. प्रकरणाचा अभ्यास करून तो आपल्या सहकाऱ्यांसह ताऊंच्या बंगल्यावर दाखल होतो. त्यांच्यासह घरातील सर्वांना या कारवाईच्या कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यानंतर घराची झडती सुरू होते. अनेक तास अमेयच्या हाताला काहीच लागत नाही, तो निराश होतो. ताऊ या गोष्टीचा बदला घेण्याच्या धमक्याही देऊ लागतात. मात्र, अमेयला घराच्या नकाशावरून शंका येते आणि मोठ्या अक्कलहुशारीनं तो घरात दडवलेली सुमारे 400 कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतो. या काळात ताऊ आपल्या समर्थकांना गोळा करून अमेय व त्याच्या टीमविरुद्ध भडकावतो. मोठा हल्ला होतो. अमेय व त्याचे सहकारी या हल्ल्याला कसे तोंड देतात, मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंतचा हस्तक्षेप अमेयला कारवाईपासून मागे हटवतो का, अमेय ताऊंची सर्व मालमत्ता जमा करून घेण्यात यशस्वी होतो का, या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या उत्कंठावर्धक शेवटात मिळतात.
चित्रपटाची कथा इन्कमटॅक्स अधिकारी शारदाप्रसाद पांडे यांच्या आयुष्यावर बेतलेली सत्यघटना असून, तिच्यात संघर्ष ठासून भरला आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता हा संघर्ष शेवटपर्यंत टिकून राहील याची काळजी घेतात. सुरवात संथ असली तरी 'रेड' सुरू होताच कथा वेग पकडते. प्रामाणिकपणा ही ताकद असलेला सरकारी अधिकारी आणि कोणालाही वाकवू शकतो, ही घमेंड असलेला राजकारणी यांच्यातील सामना रंगतच जातो. चुरचुरीत संवादांमुळं त्यात आणखी रंग भरले जातात. अमेय बरोबरच्या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत होत जाणार बदल, आपले भाऊ, मुलं, सुना आणि आई यांपैकी एकावर ताऊंचा बळावत चाललेला संशय व त्यातून त्यांची होणारी घालमेल हे प्रसंग छान जमले आहेत. पैसा लपवण्याचे त्यावेळेसचे मार्ग आश्चर्यचकित करतात व चेहऱ्यावर हास्यही फुलवतात. काही प्रसंगावर अक्षयकुमारच्या 'स्पेशल 26'चा प्रभाव जाणवतो.
अजय देवगणनं प्रामाणिक अधिकाऱ्याच्या भूमिकेत छाप पाडतो. रफ ऍण्ड टफ लुक, भेदत संवादफेक, ताऊशी संघर्ष सुरू झाल्यावर बदलत गेलेली देहबोली यांतून तो प्रेक्षकांची वाहवा मिळवतो. सौरभ शुक्ला ताऊ या राजकारण्याच्या भूमिकेत फिट्ट बसतात. घरच्यांनीच दगाफटका केल्याचा संशय आल्यानं त्यांचं खचत जाणं आणि सर्वोच्च पदावरील राजकारण्यांकडं मदत मागताना चेहऱ्यावरचं लाचारी दाखवणं जमून आलं आहे. एलिना डिक्रूझला फारशी संधी नसली, तरी अमेयला धैर्यानं साथ देणाऱ्या पत्नीची भूमिका तिनं जीव ओतून केली आहे.
एकंदरीतच, सत्यघटनेवर आधारित व काळ्या पैशाच्या लढाईतून देशभक्तीचा संदेश देणारा हा थरारपट खिळवून ठेवतो.
श्रेणी : 3
- निर्मिती : अभिषेक पाठक, भूषणकुमार
- दिग्दर्शन : राजकुमार गुप्ता
- भूमिका : अजय देवगण, एलिना डिक्रूझ, सौरभ शुक्ला