'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अ‍ॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीकांत ट्रोल | Rajinikanth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajinikanth and Puneeth Rajkumar

'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अ‍ॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीकांत ट्रोल

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार Puneeth Rajkumar यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं २९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. सुपरस्टार रजनीकांत Rajinikanth यांनी ट्विट करत पुनीत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. मात्र यामुळेच ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. रजनीकांत यांनी १० नोव्हेंबर रोजी ट्विट करत पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली. याच ट्विटमध्ये त्यांनी त्यांची मुलगी सौंदर्याच्या अ‍ॅपवर अपलोड केलेली ऑडिओ लिंक शेअर केली. 'तुम्ही शोक व्यक्त करत आहात की अ‍ॅपचं प्रमोशन करत आहात,' असं म्हणत नेटकऱ्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली.

'तुझ्या निधनाची बातमी मी अजूनही पचवू शकत नाही, पुनीत तुझ्या आत्म्याला शांती मिळो', असं ट्विट रजनीकांत यांनी केलं. यासोबत जोडलेल्या ऑडिओ लिंकमध्ये ते म्हणाले, "उपचारानंतर मी हळूहळू बरा होतोय. मी रुग्णालयात असताना पुनीत राजकुमारचं अचानक निधन झालं. दोन दिवसांनंतर मला त्याच्या निधनाची बातमी कळली. पुनीतच्या अचानक जाण्याने मला मोठा धक्का बसला. माझ्या डोळ्यांसमोर तो लहानाचा मोठा झाला. तो खूप प्रतिभावान, सुसंस्कृत, दयाळू आणि चांगला मुलगा होता. फारच लवकर तो हे जग सोडून गेला. कन्नड चित्रपटसृष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय. पुनीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. त्याच्या आत्म्याला शांती मिळो." रजनीकांत यांचा हा ऑडियो 'हुटे' Hoote अ‍ॅपवर अपलोड करण्यात आला. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही या अ‍ॅपची सहसंस्थापक आहे.

हेही वाचा: आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून शाहरुखने केली 'या' विश्वासू व्यक्तीची निवड

'धक्कादायक.. तुमच्यासारख्या महान व्यक्तीने श्रद्धांजली देताना अशा पद्धतीने अ‍ॅपचं प्रमोशन करू नये', असं एकाने लिहिलं. तर 'ही श्रद्धांजली आहे की अ‍ॅपचं प्रमोशन', असा उपरोधिक सवाल दुसऱ्याने केला. 'जे कोणी त्यांचं अकाऊंट वापरत आहेत, त्यांनी अशा अत्यंत वाईट पद्धतीने अ‍ॅपचं प्रमोशन करू नये', अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

पुनीत राजकुमार यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारे ते कलाकार होते. चाहत्यांमध्ये ते अप्पू या नावाने ओळखले जात होते.

loading image
go to top