
जिजाऊंची देहबोली आत्मसात करण्यासाठी दिवस-दिवसभर नऊवारीत
कोल्हापूर: ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही भूमिका मी अक्षरशः जगले... या भूमिकेनं खऱ्या अर्थानं ‘रिस्पेक्ट’ मिळवून दिला आणि पर्सनल आयुष्यातही ‘स्ट्राँग’ बनवलं... अगदी कोरोनाच्या काळातही मी त्याचमुळे अजिबात डगमगले नाही... अभिनेत्री अमृता पवार संवाद साधत होती आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ जगतानाच्या तिच्या आठवणींचे विविध पदर उलगडत होते. आज (मंगळवारी) सर्वत्र राजमाता जिजाऊंची जयंती साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिजाऊंच्या चरित्रातून नेमकं काय घ्यावं, या विषयावर तिच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.
अमृता सांगते, ‘‘मुळात जिजाऊंची भूमिका साकारणं, हे तसं आव्हानच होतं. कारण एक तर शिवकालीन भूमिका. त्यावेळची शुद्ध भाषा, तिच्या लहेजापासून ते अगदी शब्दोच्चारापर्यंत प्रत्येक गोष्टीवर कष्ट घ्यावे लागले. त्यासाठी अनेक पुस्तकं वाचली. भाषेच्या बाबतीत ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी एक कार्यशाळाच ठरली. मात्र, त्यामुळे आता कुठल्याही नॉर्मल भाषेतील संवाद मी अगदी सहजपणे पाठांतर करू शकते.’’
जिजाऊंची देहबोली आत्मसात करण्यासाठी दिवस-दिवसभर नऊवारीत राहिले. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा या शिवकालीन युद्धकला असोत किंवा घोडेस्वारी; त्यासाठी तर महिनाभर कसून सराव केला. त्याचा फायदा असा झाला, की फिजिकली आणि मेंटली अशा दोन्ही पातळीवरही मी माणूस म्हणून ‘स्ट्राँग’ बनले. त्याचाच फायदा कोरोनाच्या काळात अधिक झाला. घाबरले नाही. डगमगले नाही. पुन्हा नव्या नेटानं उभी राहिले, असेही अमृता आवर्जून सांगते. एखादी भूमिका लोकप्रिय झाली की पुढच्या भूमिकांबाबतची जबाबदारी वाढत असते. जिजाऊंच्या भूमिकेनं जेवढा ‘रिस्पेक्ट’ दिला तेवढीच आता माझीही जबाबदारी वाढली आहे.
पाय घट्ट रोवून उभं राहायचं...
ज्या काळात कुठलीही आधुनिक साधने उपलब्ध नव्हती, त्या काळात जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पूर्णही झाले. अनेक अडचणी, संकटांवर मात करत स्वराज्याचे तोरण बांधले गेले; मात्र तो आणि सध्याचा काळ असा तौलनिक विचार केला तर मग सध्याच्या किरकोळ संकटांनाही एक महिला म्हणून किंवा माणूस म्हणून आपण इतके का घाबरतो? कितीही संकटं आली तरी पाय घट्ट रोवून उभं राहण्याचा ‘कॉन्फिडन्स’ही जिजाऊंच्या भूमिकेनंच दिला. जिजाऊंच्या चरित्रातून तरुणाईने तो आदर्श घ्यायलाच हवा, असेही अमृता सांगते.
संपादन- अर्चना बनगे