
राजपाल यादववर गुन्हा दाखल, सिनेमात काम देतो म्हणत 20 लाख उकळल्याचा आरोप..
rajpal yadav : बॉलीवुड मध्ये विनोदी अभिनेते अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहेत, त्यातीलच एक दिग्गज म्हणजे अभिनेता राजपाल यादव. गेली अनेक वर्ष त्याच्या विविध भूमिकांमधून त्याने आपल्याला भरभरून आनंद आणि हास्य दिले आहे. एवढेच नव्हे तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटातूनही त्याने आपल्याला हसवलं. पण सध्या राजपाल काहीसा अडचणीत आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे, कारण इंदोर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. २० लाखांच्या फसवणुकी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदोरमधील बिल्डर सुरिंदर सिंग यांनी अभिनेता राजपाल यादवच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राजपाल यादवने माझ्या मुलाला सिनेृष्टीत पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिला इतर गोष्टीत मदत करण्यासाठी माझ्याकडून २० लाख रुपये घेतले होते. मात्र आतापर्यंत राजपाल यादवने माझ्या मुलाला कोणतेही काम मिळवून दिलेले नाही. तसेच त्याला सिनेसृष्टीत काम करण्यासाठी कोणती मदतही केलेली नाही, असा आरोप या बिल्डरने केला आहे.
'यानंतर त्याला पैसे परत करण्यास सांगितले असता तो गायब झाला. आता राजपाल आपला फोन उचलत नाही. तसेच तो पैसे देखील परत करत नाही,' असा आरोप त्या बिल्डरने केला आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून त्या बिल्डरने इंदोरमधील तुकोगंज पोलिसात तक्रार दिली. इंदोर पोलिसाकडे तक्रार नोंदवली असून राजपाल यादवला येत्या १५ दिवसात पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटिस बजावली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले उपनिरीक्षक लालन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरिंदर सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणाची तक्रार दिली होती. याच आधारे राजपाल यादवला नोटीस बजावण्यात आली असून येत्या १५ दिवसात या प्रकरणावर उत्तर द्यावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
Web Title: Rajpal Yadav Accused Of Cheating Indore Police Issues Notice To The Actor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..