
Rakhi Purnima ;बहीण माझी लाडाची
राखी पौर्णिमा हा सण म्हणजे भाऊ व बहिणीमधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक. या सणानिमित्त बहीण भावाला राखी बांधते. बहीण आणि भावाचे नाते अतूट करणाऱ्या या सणाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या भावासाठी दीर्घायुष्याची मागणी करते. याच सोज्वळ आणि प्रेमळ नात्याविषयी रुपेरी पडद्यावरील कलाकारांनी आपल्या बहिणीसंदर्भात भावनांना उजाळा दिला आहे.
अभिजित खांडकेकर
मला एक मोठी बहीण असून तिचे नाव केतकी आहे. मी कामानिमित्त मुंबईत असतो आणि ती पुण्यात असल्याने वर्षातून कमी भेटीगाठी होतात. वर्षातून आम्ही एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करतो; परंतु भेट घडली जरी नसली तरीदेखील फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात असतो. आज मी जो कोणी आहे त्यामध्ये तिचादेखील मोठा वाटा आहे. लहानपणी माझ्या बहिणीने अभ्यासात खूप साह्य केले आणि या गोष्टी माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील.
मंगेश बोरगावकर
रक्षाबंधन सण येतो, तेव्हा मला लहानपणीचे दिवस आठवतात. आमचा खूप मोठा परिवार आहे. लातूरमध्ये माझ्या मामा आणि काकांच्या मुली, सख्ख्या बहिणीप्रमाणे आहेत. आम्ही एकूण १० ते १२ भावंडे एकत्र यायचो आणि हा सण साजरा करायचो. मी माझ्या बहिणींसोबत राखी खरेदी करायला जायचो. मला कोणती राखी हवी आहे, ते सांगायचो. मी त्यांना घेऊन खूप दुकाने फिरायचो. त्या काळी लातूरमध्ये मुला-मुलांमध्ये एक चुरस निर्माण व्हायची की, कोणाच्या मनगटावर किती राख्या आहेत. ती मज्जा वेगळीच असायची. आता मोबाईलच्या दुनियेत भेटीगाठी व आपुलकी कुठेतरी कमी झाली आहे, असे मला वाटते. कारण सुरुवातीच्या काळात फोन नव्हते, तेव्हा आम्ही खूप मज्जा करायचो. आता फोन आणि कामाच्या व्यापामुळे सगळे व्यस्त झाले आहेत. तरीदेखील आम्ही एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करतो.
विजू माने
मी कायम वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे करतो. मला सख्खी बहीण नाही. टिटवाळ्यामध्ये महिलांसाठी अनाथाश्रम आहे. तेथील भगिनी मला राख्या बांधतात. त्यानंतर ठाणे शहरात सिग्नल शाळा आहे, तिथल्या मुली मला राखी बांधतात. मला मावस बहिणी आहेत, ज्या मला राखी बांधायला येतात; परंतु मी जास्त ठाणे आणि टिटवाळ्यात रमतो. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणित होतो. पूर्वी एकदा मी कुशल बद्रिके यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात घेऊन गेलो होतो, तेव्हा त्यांचे दोन्ही हात राख्यांनी पूर्ण भरलेले होते. त्या वेळेला त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्याचा मुलींबद्दल वाटलेला कळवला, हा क्षण खूप अविस्मरणीय होता. भंडारा येथील क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व भावांसाठी एक संदेश द्यायचा आहे. स्त्रीला तिचा आदर दिला पाहिजे. जर आदर देता येत नसेल, तर बहिणीकडून राखी बांधून घेण्यात काही अर्थ उरत नाही, असे मला वाटते.
सौरभ गोखले
मला सख्खी बहीण नाही; परंतु मला दोन आत्ते बहिणी आहेत, त्या सख्ख्या बहिणींपेक्षा कमी नाहीत. एक दिल्लीत राहणारी असून तिचे नाव प्रिया आहे. ती एक वकील, उत्तम लेखिका असून सुंदर पुस्तके लिहिते आणि दुसरी अमेरिकेत स्थायिक झाली आहे, तिचे नाव मनाली. ती एका कंपनीत कार्यरत आहे. आमचे खूप घट्ट आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. मी दर वर्षी त्यांना स्वतःच्या हातातून तयार केलेली भेटवस्तू देत आलो आहे, यातच प्रेमाचा ओलावा असतो. मग ते अगदी ग्रीटिंग कार्ड असेल, पुस्तक असेल अथवा इतर काही. माझी एकच इच्छा आहे, त्यांची जशी वाटचाल चालू आहे, तशी पुढेदेखील चालू राहू दे. दोघेही उत्तम स्तरावर काम करीत आहेत. त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच माझी इच्छा आहे.