'पुरुषा'ची नवी गोष्ट..!

तेजल गावडे 
बुधवार, 24 मे 2017

अस्तित्व संस्थेच्या सहयोगानं "रंगालय'निर्मित आणि हृषिकेश कोळी दिग्दर्शित "वर खाली दोन पाय' नाटकाचा शुभारंभ नुकताच जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये पार पडला. पहिलाच प्रयोग आणि तोही हाऊसफुल असल्यामुळे या नाटकाच्या निर्मात्या वैशाली भोसले यांनी खूप खुश असल्याचं सांगितलं. यानिमित्तानं त्यांच्याशी केलेली ही बातचीत... 

अस्तित्व संस्थेच्या सहयोगानं "रंगालय'निर्मित आणि हृषिकेश कोळी दिग्दर्शित "वर खाली दोन पाय' नाटकाचा शुभारंभ नुकताच जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये पार पडला. पहिलाच प्रयोग आणि तोही हाऊसफुल असल्यामुळे या नाटकाच्या निर्मात्या वैशाली भोसले यांनी खूप खुश असल्याचं सांगितलं. यानिमित्तानं त्यांच्याशी केलेली ही बातचीत... 

"रंगालय'निर्मित "वर खाली दोन पाय' हे नाटक जयवंत दळवी यांच्या "पुरुष' नाटकावर आधारित आहे. ज्याप्रमाणे "पुरुष' नाटकाचं नाव घेतलं जातं, त्याप्रमाणेच काही वर्षांनंतर जेव्हा जेव्हा "पुरुष' नाटकाचा उल्लेख होईल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी "वर खाली दोन पाय' नाटकासोबत "रंगालय'चाही आवर्जून उल्लेख केला जाईल, असा विश्‍वास निर्मात्या वैशाली राहुल भोसले यांनी व्यक्त केला. त्या एक अभिनेत्री असून, त्यांनी नाटक, मालिका व चित्रपटांत काम केलं आहे. अभिनयाकडून निर्मिती क्षेत्राकडे पदार्पण करण्याबाबत त्यांनी सांगितलं की, मी व माझा नवरा राहुल भोसले आमचा बऱ्याच दिवसांपासून प्रॉडक्‍शन हाऊस सुरू करण्याचा विचार सुरू होता. त्यात राहुल कार्यकारी निर्माता असल्यामुळे त्याला कामाचं स्वरूप माहिती आहे आणि मी कलाकार असल्यामुळे कलाकारांच्या गरजा मला माहीत आहेत. या गोष्टींचा विचार करून आम्ही व सुगंधा सुहास कांबळेनं "रंगालय' संस्थेची स्थापना केली. वेगळा विचार, वेगळा विषय व वेगळा प्रयोग असं प्रत्येकाला वेगळं काहीतरी करावसं वाटतं. पण, फक्त बोलण्यापेक्षा कृतीत कसं आणता येईल, याचा विचार करीत असताना दिग्दर्शक हृषिकेश कोळीची "वर खाली दोन पाय'ची स्क्रिप्ट ऐकायला मिळाली. ही स्क्रिप्ट ऐकल्यानंतर हा विचार आला की हे नाटक बोल्ड असलं तरी महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवं. म्हणून या नाटकाची निर्मिती करायचं आम्ही ठरवलं. 
हृषिकेशकडून "वर खाली दोन पाय' या नाटकाबद्दल ऐकलं, तेव्हा सुन्न व्हायला झालं. या नाटकात स्त्रीवाद (फेमिनिझम) पुरुषांकडून ऐकायला मिळतो. दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुष असा भेदभाव जेव्हा मिटेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्रीवाद उभा राहू शकेल असं मला हे नाटक पाहिल्यानंतर वाटल्याचं वैशाली सांगत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, या नाटकात वेगवेगळे कंगोरे आहेत. हे नाटक स्त्रीवाद, जातीयवाद व खलनायक वृत्तीवर भाष्य करतं. हे एक वेगळं नाटक असून प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं दिसेल. तसंच या नाटकाचा सेट आतापर्यंत न पाहिलेला असा असून, सेटवरील प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. या नाटकाला गायक भरत बळवल्ली यांचा स्वरसाज लाभलाय. 
"वर खाली दोन पाय' नाटकात मराठी रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रातील नावारूपास आलेले कलाकार पाहायला मिळणार आहेत. सुशील इनामदार, नंदिता पाटकर, रोहन गुजर, संग्राम समेळ, पल्लवी पाटील, मयूरा जोशी, अमेय बोरकर, अजित सावंत या कलावंतांसोबत स्मृती पाटकर व ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे या नाटकात मुख्य भूमिकांमध्ये आहेत. नाटकातील कलाकारांबद्दल बोलताना त्यांचं कौतुक करताना वैशाली भोसले आवर्जून सांगतात की, या नाटकातील प्रत्येक कलाकारानं समर्पित होऊन काम केलंय. सुरुवातीला या कलाकारांच्या वेळा, दिवस, इतर गोष्टी कशा मॅनेज होणार याचं खूप दडपण होतं. पण, संपूर्ण टीम खूप चांगली असून, त्यांनी सांभाळून घेतलं. तसेच ते प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात. प्रत्येक जण आपल्या कामातून वेळ काढून तालमीला येतो. ज्येष्ठ कलाकार चंद्रकांत मेंहदळे यांना जवळपास 50 ते 60 वर्षांचा रंगभूमीचा मोठा अनुभव आहे. त्यांनीही सर्वांसोबत मिसळून घेतलं. त्यांच्या नाटकाचा अनुभव ते सगळ्यांसोबत शेअर करायचे. त्यामुळे त्यांचा अनुभव सर्वांच्या कामी आला. तसंच हृषिकेशनं या सर्व कलाकारांना बोलतं केलं. त्यांना या पात्रांविषयी काय वाटतं ते जाणून घेतलं आणि लिहायला लावलं. त्यामुळे प्रत्येक कलाकार त्यानं साकारलेल्या पात्राबद्दल बेधडक हवं तितकं बोलू शकतो. त्यानं ती प्रोसेस घडवली आणि सगळ्यांकडून करून घेतलं. आतापर्यंतचा माझा अनुभव खूप छान होता, असं त्या सांगत होत्या. 
मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही या नाटकात अभिनय का करीत नाही. नाटक वेगळं असल्यामुळे मलाही सुरुवातीला काम करावंसं वाटत होतं. मात्र, रिहर्सलच्या वेळी लक्षात आलं की कलाकार व निर्माता या दोघांच्याही जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळणं शक्‍य नाही. नीलेश सानप हा निर्मिती व्यवस्था पाहतो; मात्र त्याच्यावर पूर्ण जबाबदारी टाकणं योग्य नव्हतं. त्यात राहुललाही वेळ नसल्यामुळे मी पूर्णपणे निर्मितीकडे लक्ष द्यायचं ठरविलं. माझ्यासोबत सुगंधा सुहास कांबळे याही नाटकाच्या निर्मात्या आहेत. प्रवीण कांबळे सहनिर्माते आहेत. त्या म्हणाल्या... साधारण मालिका व चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीम असतात; पण आमच्या नाटकाची क्रिएटिव्ह टीम आहे. सोशल मीडियाची जबाबदारी वैभव शेटकरकडे होती. क्रिएटिव्ह टीममध्ये सुबोध एरंडे, विशाल देवरूखकर; तर संकलनाचं काम ग्लुस्कॅप मीडियानं केले. या क्रिएटिव्ह टीममुळे सोशल मीडियावर टीझर व ट्रेलरचा वेगळा प्रयत्न करू शकल्याचं त्यांनी सांगितलं. ट्रेलर व टीझरला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सगळीकडे या नाटकाची खूप चर्चा होतेय. असाच प्रतिसाद तिकीट बारीवरही मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
आगामी प्रोजेक्‍टबाबत वैशाली भोसले म्हणाल्या की, "रंगालय' ही एक चळवळ आहे. यानंतरही आम्ही वेगवेगळ्या कलाकृती सादर करणार आहोत. पण, पुढील प्रोजेक्‍ट नाटकच असेल, असं नाही. 

Web Title: Rangalay new story