रणवीर सिंहला बॉलीवूडमध्ये १० वर्ष पूर्ण, रणबीर कपूरमुळे मिळाला होता रणवीरला ब्रेक

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 11 December 2020

अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर रणवीरला ‘बँड बाजा बारात’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाच्या निमित्तानं त्याने बॉलिवूडमध्ये १० वर्ष पुर्ण केली आहेत.

मुंबई-  बॉलीवूडचा एनर्जिटीक अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. रणवीरने कमी वेळात त्याच्या अभिनयाने, मस्तीखोर अंदाजाने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. रणवीर सध्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. या अष्टपैलू अभिनेत्यानं रोमँटिक हिरोपासून थरकाप उडवणाऱ्या खलनायकापर्यंत अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्याने अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर त्याला ‘बँड बाजा बारात’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाच्या निमित्तानं त्याने बॉलिवूडमध्ये १० वर्ष पुर्ण केली आहेत.

हे ही वाचा: व्हिडिओ: संगीतकार भिडेंच्या निधनानंतर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

रणवीर सिंहने आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या करिअरवर भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील काही थक्क करणारे प्रसंग सांगितले. तो म्हणाला, “लहानपणापासूनच मला अभिनयाची प्रचंड आवड होती. लोकांना आश्चर्यचकित करायला मला खूप आवडतं. याच स्वभावने मला बॉलिवूडच्या दिशेने आकर्षित केलं. कुटुंबातील काही लोकांची बॉलिवूडमध्ये थोडीफार ओळख होती त्यामुळे मला सहज काम मिळेल असं वाटत होतं. पण माझा हिरमोड झाला. जवळपास सहा वर्ष मी कामाच्या शोधात होतो. अनेक निर्मात्यांना भेटलो. ऑडिशन्स दिली. निर्मात्यांच्या ऑफिसबाहेर तासनतास बसायचो पण काम मिळत नव्हतं. मग सिनेमांमध्ये एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून काम शोधू लागलो. त्याचवेळी मला 'बँड बाजा बारात' या सिनेमाविषयी माहिती मिळाली आणि मी ऑडिशन दिलं. सुरुवातीला रणबीर कपूर या सिनेमात झळकणार होता मात्र तो या सिनेमातून बाहेर पडला आणि ही संधी मला मिळाली. सुदैवानं प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला. त्यामुळे इतर निर्मात्यांनी देखील माझ्यावर गुंतवणूक केली.”

२०१० साली 'बँड बाजा बारात' या सिनेमातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात रणवीरसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने मुख्य भूमिका साकारली होती. जबरदस्त गाणी आणि उत्तम पटकथा यामुळे हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला. या सिनेमामुळेच रणवीर रातोरात सुपरस्टार झाला. आज या सिनेमाला १० वर्ष पुर्ण झाली आहेत. या सिनमाच्या निमित्ताने रणवीरने देखील बॉलिवूड कारकिर्दीची १० वर्ष पूर्ण केली आहेत. त्याचा हा प्रवास सांगताना तो खूप भावूक झाला होता. त्याने थिएटरमध्ये जाऊन त्याच्या आठवणींना उजाळा देत ही ऍनिवर्सरी सेलिब्रेट केली. 

ranveer singh clocks 10 years in bollywood  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh clocks 10 years in bollywood