जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

चित्रपट संग्रहालयाचा समृद्धीत भर
जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना कुटुंबीयांकडून भेट

पुणे  : दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक दुर्मिळ खजिना आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी नुकताच कोल्हापूर येथे हा दुर्मिळ ठेवा संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे दानवे हे पुण्यात जन्मलेले आणि अगदी सुरवातीला त्यांनी मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली. त्यानंतर १९३०च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली.

‘सावकारी पाश’ (१९३६), ‘सासुरवास’ (१९४६), ‘मीठभाकर’ (१९४९ ), ‘मोहित्यांची मंजुळा’ (१९६३), ‘मराठा तितुका मेळवा’ (१९६४) आणि ‘आंधळा मारतो डोळा’ (१९७३) अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या होत्या. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असिरे हवीश’ या उर्दू चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. १९३० आणि १९४० च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू चित्रपटांतून कामे केली. ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांचीही भूमिका असलेल्या वाल्मीकी (१९४६) चित्रपटातही दानवे यांनी काम केले होते.

संग्रहात काय आहे?
- असंख्य दुर्मिळ छायाचित्रे
- हॅंडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका
- वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख,
- जुनी कागदपत्रे, पुस्तके
- कृष्णधवल छायाचित्रे,
- दानवे यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके
- त्यांनी हॅम्लेट (१९३३) नाटकात वापरलेले काही विग, मिशा

भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ‘युगा’तील एक ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा हा संग्रह मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून आहे. संशोधकांना याचा उपयोग होणार आहे.
- प्रकाश मगदूम, संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rare treasure from Jaishankar Danve is now in the National Film Museum