लक्ष्मण लोंढे स्मृतिदिनी प्रमोद पवार, विवेक लागू करणार अभिवाचन

टीम ई सकाळ
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक डॉ. बाळ फोेंडके तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व संपादक दिनकर गांगल उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक डॉ. बाळ फोेंडके तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व संपादक दिनकर गांगल उपस्थित राहणार आहेत. व्हिजन आणि लोंढे कुटुंबियांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२०१५ साली लक्ष्मण लोंढे यांचे निधन झाले. विज्ञानसाहित्य हेच मुख्य लेखनक्षेत्र निवडून त्या विषयावरील कथा, कादंबरी, एकांकिका, नाटके, लेख, निबंध असे विपुल साहित्य लोंढे यांनी लिहीले. चित्रकारीता, रांगोळी, अभिनय अशा अन्य क्षेत्रांतही त्यांचा लिलया वावर होता. त्यांची सुमारे ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘आरण्यक’ ही त्यांच्या गाजलेल्या अनेक एकांकिकांपैकी एक. या एकांकिकेचे अभिवाचन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार करणार आहेत, तर अभिनेते विवेक लागू ‘टपरी’ या कथेचे अभिवाचन करणार आहेत. अन्य अभिवाचकांमध्ये धनश्री करमरकर, मेघश्री दळवी, श्रीनिवास नार्वेकर यांचा सहभाग राहणार आहे.

या स्मृतीदिन कार्यक्रमामध्ये लक्ष्मण लोंढे यांच्यावरील ध्वनी-चित्रफित दाखवण्यात येणार असून लक्ष्मण लोंढे व स्वाती लोंढे या पती-पत्नींनी लिहीलेल्या प्रवासलेखनाच्या संग्रहाचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा लोंढे करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून साहित्य रसिकांनी व लक्ष्मण लोंढे यांच्या लेखनाच्या चाहत्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोंढे कुटुंबिय व व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reading chala vachu ya esakal news