रेखा-अमिताभ कधी सुरू झाला ‘सिलसिला’?

रेखा-अमिताभ कधी सुरू झाला ‘सिलसिला’?

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील ऑफ स्क्रीन अफेअर हे बॉलीवूडमधील सर्वांधिक चर्चा झालेलं अफेअर आहे. त्यात कितपत तथ्य होतं, याविषयी आजही शंका उपस्थित केली जाते. पण, सार्वजनिक ठिकाणी अमिताभ आणि रेखा यांना कधीच एकत्र पहायला मिळालेलं नाही. या सगळ्याची सुरुवात आणि शेवट कुठं झाला हे मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे.

दोन अंजाने    
अमिताभ आणि रेखा यांनी दोन अंजाने सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले. 1976ला हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी अमिताभ यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. सिनेमात रेखा यांनी एका महत्त्वाकांक्षी महिलेची भूमिका केली होती. अमिताभ यांचे जंजीर, दिवार, शोले हे सिनेमे रिलीज झाले होते. त्यामुळं अमिताभ यांना एक वेगळं वलय मिळण्यास सुरुवात झाली होती. पण, त्या तुलनेत दोन अंजाने सिनेमाला माफकच यश मिळालं.

मिस्टर नटवरलाल
अमिताभ आणि रेखा यांनी मिस्टर नटवरलाल या एक्शन कॉमेडी सिनेमातही एकत्र काम केलं. यात अमजद खान, अजित खान यांच्याही भूमिका होत्या. अमिताभ-रेखा या रोमँटिक जोडीला पडद्यावर पाहून प्रेक्षक खूष होत होते. सिनेमानं बऱ्या पैकी यश मिळवलं. पण, सिनेमापेक्षाही त्यातील ‘परदेसीया ये सच है पिया...’ हे गाणं मात्र खूप गाजलं. बॉलिवूडमधील एव्हरग्रीन गाण्यांमध्ये या गाण्याचा उल्लेख केला जातो. 

मुकद्दर का सिकंदर 
मुकद्दर का सिकंदर या सिनेमात अमिताभ-रेखा यांच्यातील रोमान्स आजही पाहण्यासारखा आहे. रेखा यांचं जोहराचं कॅरेक्टर आणि अमिताभ यांच्या मिठीतच तिचं जीव देणं, सगळच लाजवाब होतं. सिनेमातलं सलाम-ए-इश्क मेरी जा गाण्यानं तर धुमाकूळ घातला होता. या गाण्यात ‘इसके आगे की दासताँ तू मुझसे सून...’ या अमिताभ यांच्यात तोंडातील ओळींचे आजही लाखो फॅऩ्स आहेत. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या अप्रतिम गाण्यावर रेखा आणि अमिताभ यांनी डोळ्यांतून व्यक्त केलेल्या अभिनयाने कळस चढवला होता. 

सुहाग
रेखा आणि अमिताभ यांचा सुहाग हा सिनेमा 1979मध्ये रिलीज झाला होता. त्यात शशी कपूर आणि परवनी बॉबी यांच्याही भूमिका होता. एक्शन-कॉमेडी या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. सिनेमातील ‘अठरा बरस की तू, होने को आयी है...’ या गाण्यात पुन्हा अमिताभ-रेखा यांची केमिस्ट्री चाहत्यांना पहायला मिळाली. ही जोडी भविष्यातही अशीच पुन्हा पुन्हा पडद्यावर पहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. 

सिलसिला
अमिताभ आणि रेखा यांचा शेवटचा एकत्र सिनेमा म्हणजे, सिलसिला. यश चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यात अमिताभ रेखा यांच्याबरोबरच जया बच्चनही होत्या. जणू जया, अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेम त्रिकोणावरच हा सिनेमा लिहिलाय की काय, असं सगळ्यांना वाटत होतं. सिनेमाला पंडित शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरासिया यांच्या जोडीनं संगीत दिलं होतं. ‘रंग बरसे भिगे चुनरवाली’ हे गाणं हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलं होतं. या गाण्यात तर, जया-अमिताभ-रेखा रिअल लाईफ त्रिकोण आपल्याला पडद्यावर पहायला मिळतो. आजही होळीला हे गाणं सर्वाधिक वाजवलं जातं. रेखा-अमिताभ जोडीचा शेवट मात्र या सिनेमानं झालं. पुन्हा दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही किंवा त्यांना कोणी एकत्र पाहिलंही नाही. दोघांमधील नात्यावर त्यांना विचारण्याचं धाडसही आजवर कोणी केल्याचं बघितलं नाही. त्यामुळं बॉलिवूडची ही लव्हस्टोरी आजही चर्चेत असते. 

जया-रेखा कायमच दुरावा
अमिताभ आणि रेखा यांच्यातील कथित प्रेम संबंधांमुळे बच्चन दाम्पत्यात दुरावा येत असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण, या मोठ्या वादळातही हे घर टिकून राहिलं. पण, बच्चन यांच्या पत्नी जया आणि रेखा यांनी सार्वजनिक ठिकाणी कायमच एकमेकांपासून दूर राहणे पसंत केले. एक-दोन कार्यक्रमांमध्ये त्या एकमेकिंना भेटल्यादेखील. त्यावेळचे फोटो आजही सोशल मीडियावर शेअर होतात. विशेष म्हणजे, जया बच्चन आणि रेखा दोघीही एकाचवेळी राज्यसभा सदस्य होत्या. सभागृहातही त्या कधी फारशा एकत्र दिसल्या नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com