
'माझ्यासोबत त्यांच्या मुलांना खेळू द्यायचे नाहीत लोक...', रेणुका शहाणेंचा मन हेलावून टाकणारा अनुभव
Renuka Shahane: छोट्या आणि मोठ्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणेचा ७ऑक्टोबर हा जन्मदिवस. रेणुका शहाणेनं वयाची ५६ वर्ष पूर्ण केली आहेत. सुरभी,सर्कस,अंताक्षरी सारख्या मालिका आणि शो मधनं रेणुका शहाणे घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या पण सर्वाधिक चर्चेत तेव्हा आल्या जेव्हा 'हम आपके है कौन' मध्ये त्यांनी माधुरी दिक्षितच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. रेणुका शहाणे यांनी बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न केलं,हे त्यांचे दुसरे लग्न होते. रेणुका यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला होता आणि त्यामुळे रेणुका यांना लहानपणी लोकांची निंदा-नालस्ती खूप सहन करावी लागली आहे.(Renuka Shahane said that people would discourage their children from playing with her)
रेणुका शहाणे यांच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला तेव्हा खूप लहान होत्या. आई-वडीलांच्या घटस्फोटाच्या निर्णयाचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला होता असं रेणुका शहाणे एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. रेणुका शहाणे म्हणाल्या होत्या,''आमचे शेजारी-पाजारी माझ्यासोबत त्यांच्या मुलांना खेळू द्यायचे नाहीत. माझ्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला आहे,मी एका तुटलेल्या कुटुंबातून आहे असं कारण ते मुलांना देत''.
नेटफ्लिक्सवर Behensplaining च्या स्पेशल एपिसोडमध्ये रेणुकानं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. रेणुका त्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या, ''पालक त्यांच्या मुलांना माझ्यापासून लांब रहायचा सल्ला द्यायचे. जेव्हा मी ८ वर्षांचे होते तेव्हाच माझे पालक विभक्त झाले. तेव्हा माझ्याकडे एका विचित्र नजरेनं पाहिलं जायचं. कारण मी एका घटस्फोटित आई-वडीलांची मुलगी होते. मी लोकांना बोलताना ऐकलं होतं-ते म्हणायचे,या मुलीसोबत खेळू नका,हिचं कुटुंब चांगलं नाही. म्हणजे मला वाटायचं की मी या मुलांना स्पर्श केला तर यांचं पण कुटुंब तुटेल की काय म्हणून हे असं बोलतायत मला''.
अर्थात,आता रेणूका शहाणे यांची देखील दोन लग्न झाली आहेत. रेणुका शहाणे यांचं पहिलं लग्न मराठीतील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत झालं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लवकरच दोघे विभक्त झाले. यानंतर रेणुका शहाणे यांच्या आयुष्यात आशुतोष राणा यांची एन्ट्री झाली. बोललं जातं रेणुका शहाणे यांना पाहता क्षणीच आशुतोष राणांना त्या आवडल्या होत्या. रेणुका शहाणे घटस्फोटित असूनही आशुतोष राणा त्यांच्यावर लट्टू झाले होते. त्यानंतर दोघं लग्नंबंधनात अडकले.
आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची पहिली भेट हंसल मेहता यांच्या सिनेमाच्या निमित्तानं झाली होतीत आणि गायिका राजेश्वरी सचदेवमुळे ही भेट घडून आली होती. आणि त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली,मग मैत्री झाली, त्यानंतर रेणुकानं आशुतोषला प्रपोज केलं आणि मग आशुतोषचा होकार आल्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले.