Jawani Janeman Review : वडील-मुलीचा हटके ड्रामा...

संतोष भिंगार्डे
Friday, 31 January 2020

जवानी जानेमन या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी "फिल्मिस्तान' व "मित्रो' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

"तान्हाजी...द अनसंग वॉरियर' या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खानने उदय भान राठोडची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि आता याच महिन्यात सैफचा "जवानी जानेमन' हा चित्रपट आला आहे. जवानी जानेमन या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी "फिल्मिस्तान' व "मित्रो' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

Maidan Poster : 'तानाजी'नंतर आता अजय 'मैदान' गाजवायला सज्ज!

जवानी जानेमनमध्ये त्यांनी अत्यंत आधुनिक कथानकाला हात घातला आहे. सैफ अली खान, तब्बू, चंकी पांडे, फरीदा जलाल, कुमुद मिश्रा, जॅकी भगनानी आदी कलाकारांबरोबरच त्यांनी या चित्रपटात अलाया फर्नीचरवाला हिला ब्रेक दिला आहे. अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी अलाया. तिने या चित्रपटात टिया नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तिने शानदार ऍक्‍टिंग केली आहे. ही कथा आहे वडील आणि मुलीची. जसविंदर सिंह ऊर्फ जैज (सैफ अली खान) आणि त्याची मुलगी टिया (अलाया फर्नीचरवाला) यांच्या भोवती ही कथा फिरते. जैज हा लंडनमध्ये राहणारा मस्तमौला स्वभावाचा माणूस. दररोज पार्टी करणे आणि पार्टीतील एखाद्या मुलीला घरी आणणे यातच त्याला रस असतो. त्याला आई-वडील आणि भाऊ असतो. परंतु तो त्यांच्यापासून दूर एकटाच राहात असतो. कारण त्याला कोणतीही जबाबदारी नको असते. लग्न वगैरेचा तर तो विचारच करीत नाही. कुटुंबकबिला त्याला मान्य नसतो. आपल्या मनासारखे आयुष्य जगण्यातच तो धन्यता मानत असतो.

परंतु एके दिवशी त्याला क्‍लबमध्ये टिया नावाची मुलगी भेटते. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो तिला आपल्या घरी आणतो. टिया आपल्या वडिलांना शोधण्यासाठी ऍमस्टरडॅमहून लंडनला आलेली असते. जैजच्या घरी येताच ती तुम्ही माझे वडील आहात असे जैजला सांगते. सुरुवातीला जैजचा तिच्या बोलण्यावर विश्‍वास बसत नाही. मग ती डीएनए टेस्ट करण्यासाठी जैजला भाग पाडते. त्यानंतर काय होते ते पडद्यावर पाहिलेले बरे.

आतापर्यंत वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित चित्रपट आलेले असले तरी या चित्रपटाचे कथानक काहीसे वेगळे आहे आणि दिग्दर्शक नितीन कक्करने त्याला चांगली ट्रीटमेंट दिली आहे. सगळ्याच कलाकारांनी चांगले काम केले असले तरी सैफ अली खान व अलाया यांचे खूप कौतुक करावे लागेल. सैफने मस्तमौला व आपल्याच मस्तीत जगणाऱ्या जैजची भूमिका कमालीची साकारली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अलायाने टियाची भूमिका सहजसुंदर साकारली आहे. सैफ आणि तब्बू या कलाकारांसमोर ती तितक्‍याच धीटाईने वावरली आहे. तिची ऍक्‍टिंग शानदार. भविष्यात तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तब्बूच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आले आहेत आणि तिने ते नेहमीप्रमाणे सफाईदारपणे केले आहेत. लंडन येथील लोकेशन्स सिनेमॅटोग्राफर मनोज खतोई यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत. चित्रपटातील गाण्यांना तनिष्क बागजी, गौरव-रोशिन, प्रेम-हरदिप यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध वेगाने पुढे सरकतो खरा. परंतु कुठे कुठे चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो. हा चित्रपट मनोरंजन करणारा आहेच शिवाय भावनात्मकही आहे. दिग्दर्शकाने केलेला हा वेगळा प्रयत्न आहे. 

तीन स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: review of Hindi movie Jawani Janeman