Movie Review : 'पल पल दिल के पास'ची रोमांचित सफर

संतोष भिंगार्डे
Saturday, 21 September 2019

सनी देवोल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. करण देवोल आणि सहेर बंबा ही नवीन जोडी पडद्यावर छान दिसली आहे. त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देवोल यांचा मुलगा करण "पल पल दिल के पास' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार म्हणून
अख्ख्या बी टाऊनचे लक्ष या चित्रपटाकडे आणि करणच्या कामगिरीकडे लागलेले होते. देवोल कुटुंबीयांची ही तिसरी पिढी.

धर्मेंद्र यांनी सन 1983 मध्ये आपला मुलगा सनीला "बेताब' या चित्रपटाद्वारे लॉंच केले होते. हा रोमॅंटिक चित्रपट सगळ्यांना कमालीचा भावला होता. यातील गाणी लोकप्रिय ठरला होती आणि त्यामुळे आता सनी देवोलने आपल्या मुलाला लॉंच करताना ऍक्‍शन वगैरे चित्रपटाचा विचार न करता एका लव्हस्टोरीचा विचार केला आणि दणक्‍यात लॉंन्च केले. ही एक रोमॅंटिक कहाणी आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात करण सेहगल (करण देवोल) या "कैंप उजी' या नावाने ट्रेकिंग कंपनी चालवणाऱ्या गिर्यारोहकाने होते. त्याचे आई-वडील लहानपणीच त्याला सोडून गेलेले असतात. लहानाचा मोठा तो याच पर्वतरांगांमध्ये झालेला असतो. या पर्वतरांगांवर त्याचे खूप प्रेम असते. विशेष म्हणजे करण पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध असतो.

दिल्लीची राहणारी सहर सेठी (सहेर बंबा) ही व्हिडीओ ब्लॉगर चालविणारी तरुणी. लहानपणापासूनच ती लाडाकोडात वाढलेली असते. या व्हिडीओ ब्लॉगरसाठी ती ऍडव्हेंचर सहलीची तयारी करते. तिचे कुटुंबीय याकरिता तिला परवानगी देतात. त्यामुळे ती ऍडव्हेंचर सहलीसाठी मनालीला येते. तेथे तिची भेट करणशी होते. कारण तिची ही सहल करणच्या कंपनीबरोबर होणार असते. मग दोघे सहलीला निघतात आणि बराच काळ एकत्र घालविल्यानंतर हळहळू त्यांच्यात प्रेमाचे बंध फुलत जातात. मात्र ही ऍडव्हेंचर सहल संपल्यानंतर ते वेगळे होतात. बराच काळ लोटल्यानंतर ते जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा नेमके काय घडते, ते एकत्र येतात का? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

सनी देवोल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. करण देवोल आणि सहेर बंबा ही नवीन जोडी पडद्यावर छान दिसली आहे. त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. दोघांनीही अभिनयाच्या बाबतील आपल्याला जमेल तसा प्रयत्न केला आहे. करणने आपल्या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. मात्र यामध्ये अधिक चांगली कामगिरी केली आहे ती सहेर बंबाने. चुलबुली आणि नटखट अशी भूमिका तिच्या वाट्याला आलेली आहे आणि ती तिने उत्तमरीत्या वठविली आहे. सचिन खेडेकर, सिमॉन सिंह आदी कलाकारांनीही आपापली भूमिका उत्तम केली आहे. चित्रपटातील लोकेशन्स एकदम भारी, हिमाचल प्रदेशातील ही नयनरम्य लोकेशन्स डोळे दिपवणारी आहेत आणि विशेष म्हणजे सिनेमॅटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात ती चांगली कैद केली आहेत.

चित्रपटाचे संगीत ठीकठाक आहे. परंतु चित्रपटाच्या कथेचा प्लॉट काहीसा कमजोर वाटतो. त्यामुळे फारशी उत्सुकता वाटत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा धीमा आहे. कथानक पुढेच सरकत नाही. केवळ ट्रेकिंग आणि ट्रेकिंग यामध्ये वेळच वाया गेला आहे. चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स चित्ताकर्षक आहे. हा चित्रपट म्हणजे पर्वतरांगांमधील ही रोमॅंटिक आणि रोमांचित करणारी सफर आहे असेच म्हणावे लागेल.

अडीच स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: review of hindi movie pal pal dil ke pass