esakal | एबी आणि सीडी : उतरत्या वयात मिळणाऱ्या प्रेमाची हलकीफुलकी गोष्ट

बोलून बातमी शोधा

Review of Marathi movie AB and CD

आपल्या कुटुंबातच एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध माणसाच्या आयुष्यात अशी एखादी आश्‍चर्यकारक घटना घडते आणि नंतर त्याच्याकडे पाहण्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दृष्टिकोन कसा बदलतो हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

एबी आणि सीडी : उतरत्या वयात मिळणाऱ्या प्रेमाची हलकीफुलकी गोष्ट
sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्या चित्रपटामध्ये काय असेल याचा अंदाज बांधता येतो. एबी आणि सीडी या चित्रपटाच्या ट्रेलरवरून या चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज आला होता. आपल्या कुटुंबातच एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध माणसाच्या आयुष्यात अशी एखादी आश्‍चर्यकारक घटना घडते आणि नंतर त्याच्याकडे पाहण्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दृष्टिकोन कसा बदलतो हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुळात कथेचा गाभा तसा पाहिला तर छोटा आहे; पण दिग्दर्शक मिलिंद लेले आणि लेखक हेमंत ऐदलाबादकर यांनी ही कथा पडद्यावर मांडताना कमाल केली आहे. मुळात म्हातारपणीचा काळ हा कठीण काळ असतो. त्यावेळी आपल्या हक्काची, आपली अधिक काळजी घेणारी व आपुलकी आणि प्रेम देणारी व्यक्ती आपल्या जवळ असावी असे वाटत असते. पण त्याच वेळी हीच माणसे आपल्याला दूर सारण्याचा किंवा दूर करण्याचा हळूहळू प्रयत्न करतात आणि मग निराधार आणि एकाकी जीवन जगण्याची पाळी वृद्ध व्यक्तीवर येते. निराधार आणि निर्विकार असे आयुष्य त्याला जगावे लागते. या चित्रपटातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा चंद्रकांत देशपांडे (विक्रम गोखले) हे चित्रकलेचे निवृत्त शिक्षक. त्यांना दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार असतो. मोठ्या मुलाचे नाव गोपाळ (सागर तळाशिलकर) तर छोट्या मुलाचे नाव गोविंद (लोकेश गुप्ते). गोपाळच्या पत्नीचे नाव माधवी (सीमा देशमुख) तर गोविंदच्या पत्नीचे नाव राधा (शर्वरी लोहकरे), त्यातील राधा ही काहीशी स्पष्टवक्ती व थेट बोलणारी असते. सीडींना दोन नातवंडे असतात. एक सनी (अक्षय टंकसाळे) आणि श्रावणी (साक्षी सतीश). देशपांडे कुटुंबीय तसे सुखात असले तरी चंद्रकांत देशपांडे यांच्या जीवनात तसा म्हणावा तसा आनंद नसतो. घरात घरपण असले आणि सगळे आनंदात असले तरी चंद्रकांत देशपांडे काहीसे एकटे पडलेले आणि एकाकी जीवन जगत असतात. त्यांच्या नातवांच्या ही बाब लक्षात येते आणि त्यांचा नातू त्यांच्या जीवनात आनंदाचा मळा फुलविण्याचा विचार करतो. त्याकरिता तो एक शक्कल लढवितो.

समांतर वेबसिरीज : एकाचा भूतकाळ; तर दुसऱ्याचं भविष्य!

ती शक्कल काय असते आणि कशी असते. त्यामुळे आजोबांच्या जीवनात काही फरक पडतो का..अमिताभ बच्चन यांची एन्ट्री का आणि कशासाठी होते...वगैरे प्रश्‍नांची उत्तरे चित्रपटात आहेत. मिलिंद लेले यांनी ही हलकीफुलकी कथा पडद्यावर छान मांडली आहे. आजोबांच्या आयुष्यात नातवंडे प्रेमाचा आणि आनंदाचा झरा कसा पेरण्याचा प्रयत्न करतात हे छानपणे पडद्यावर रेखाटले आहे. वृद्धत्व फार क्रूर चेष्टा करते... हा या चित्रपटातील एकच संवाद कथेचा सार सांगणारा आहे. विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, अक्षय टंकसाळे, सायली संजीव अशा सगळ्याच कलाकारांनी आपापली कामे चोख केली आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण चित्रपट विक्रम गोखले यांनी आपल्याच खांद्यावर घेतलेला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांची या चित्रपटातील एन्ट्री पाहताच मन प्रसन्न होते आणि उत्साह खूप वाढतो. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ असला तरी उत्तरार्धात चित्रपट चांगलीच पकड घेतो. त्यातच अमिताभची एन्ट्री झाली की मन सुखावून जाते. कारण त्यांची एक एन्ट्री पाहायलादेखील त्यांचे चाहते आसुसलेले असतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुरेश देशमानेने केली आहे आणि ती छान झाली आहे. निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि दिग्दर्शिक मिलिंद लेले यांनी संपूर्ण कुटुंबाने पाहावा असा चित्रपट आणलेला आहे. एक हसतखेळत पुढे जाणारा कौटुंबिक असा हा चित्रपट आहे.

साडेतीन स्टार