'वेडिंगचा शिनेमा' - सहजसुंदर विनोदांची 'चित्रणकथा'

मंदार कुलकर्णी
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

- 'वेडिंगचा शिनेमा' कसा आहे, जाणून घ्यायचंय...मग हे वाचाच...

"वेडिंगचा शिनेमा' हा एक अतिशय खमंग, खुसखुशीत, फील गुड अनुभव आहे. हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटाच्या जातकुळीतला, सहजसुंदर विनोदाची पखरण करणारा, मधूनच डोळ्यांच्या कडा किंचित ओलावणारा, नात्यांकडं आणि जगण्याच्या प्रश्नांकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लावणारा असा हा चित्रपट.

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचं हे चित्रपटलेखन आणि दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल आहे असं कुठूनही वाटत नाही इतका सुपर फिनिश आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत एक लय कायम असलेला हा चित्रपट आहे. प्री-वेडिंग शूट असा एक वेगळाच विषय सलील कुलकर्णी यांनी हाताळला आहे, पण त्या निमित्तानं त्यांनी केलेली माणसांची खास पद्धतीची निरीक्षणं, सामाजिक निरीक्षणं, नात्यांबद्दलचं भाष्य हेही या चित्रपटात येतं आणि ते आपल्याला विलक्षण पटून जातं.

चित्रपटातल्या अनेकरंगी व्यक्तिरेखा पाहताना आपल्यालाही अशा काही व्यक्तिरेखा आठवत जातात आणि काही वेळा प्रेक्षकांच्या निरीक्षणांशी हे निरीक्षण मॅच होतं, तेव्हा येणारं हसू हे सहजस्फूर्त असतं. ते या चित्रपटात दिसतं.

प्रकाश ऊर्फ पक्‍या (शिवराज वायचळ) आणि परी (ऋचा इनामदार) या दोन ध्रुवांवरच्या व्यक्तींच्या लग्नाची आणि त्याच्या शूटिंगची ही कहाणी. प्रकाश हा सासवडचा मोबाईल व्यावसायिक, तर परी ही मुंबईतल्या डॉक्‍टर कुटुंबातली आणि स्वतः डॉक्‍टर. त्यांचं प्रेम जमतं, लग्न ठरतं. त्याचं प्रीवेडिंग शूट उर्वी (मुक्ता बर्वे) दिग्दर्शित करतेय. मदन (भाऊ कदम) डीओपी आहे. पक्‍याचे आई-वडील (अलका कुबल, शिवाजी साटम), परीचे आई-वडील (आश्विनी काळसेकर, सुनील बर्वे), पक्‍याचे भाऊ-वहिनी (संकर्षण क-हाडे, योगिनी पोफळे), बहीण (प्राजक्ता हनमघर) पक्‍याचा मित्र (प्रवीण तरडे) आदी सगळ्यांचं शूटिंग करताकरता त्या व्यक्तिरेखा उलगडतायत. उर्वी ते सगळं तटस्थपणे आणि उत्सुकतेनं बघतेय, बोलतेय आणि तिचीही एक समांतर कहाणी सुरूच आहे. ही सगळी आंबट-गोड कहाणी सांगणारा हा शिनेमा.

खरं तर एका वाक्‍यात सांगता येईल अशी कथा असणा-या चित्रपटाची गंमत आहे ती त्याच्या मांडणीत. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रसंगांतून, संवादांतून सहज प्रकारे तयार होणारा विनोद. हा हवाहवासा विनोद आहे. अनेक ठिकाणी हमखास विनोदाच्या शक्‍यता असूनही सलील कुलकर्णी यांनी त्या विनोदाची स्वतःची अशी एक लय आणि शैली ठरवली आहे आणि ती शेवटपर्यंत कायम राहते.

काही प्रसंग अतिशय धमाल आहेत. पक्‍या-परीची प्रेमकहाणी गाण्यातून उलगडण्याची गंमत, पक्‍यानं मुलगी पसंत केल्यानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया, सेलिब्रिटी या विषयावरच्या गंमतिशीर गप्पा, नृत्य बसवतानाची मजा हे सगळे भाग जमून आलेले आहेत. पक्‍याची आई परीचे फोटो मोबाईलवर बघत असताना ते फोटो संपले, की पक्‍यानं लगेच मोबाईल तिच्या हातून काढून घेणं, लग्नानंतर कुठं बघता या प्रश्नावर पक्‍या-परीचं उत्तर आल्यानंतर कारच्या आरशात उर्वीची बदललेली नजर दिसणं, मुंबईला लिफ्टमध्ये एका हायप्रोफाईल शेजारणीनं सासवडचा फलटण असा उल्लेख करणं अशा गोष्टी धमाल आहेत. पक्‍याची आई आणि उर्वीचा एक संवाद आणि परीच्या आई-बाबांचा एक प्रसंग चित्रपटाचं वेगळेपण ठळक करतात. अतिशय परफेक्‍ट कास्टिंग चित्रपटाला लाभलंय. अर्थात गाण्यांकडं तुलनेनं कमी लक्ष जातं आणि आई तुळजाभवानी हे गाणं चित्रपटाच्या एकूण मांडणीत फिट बसत नाही या गोष्टींचाही उल्लेख करायला हवा. "मामाच्या लग्नाला यायचं हं' आणि "डिंग डिंग' ही गाणी मात्र उत्तम.
मु

क्ता बर्वेच्या वाट्याला खरं तर संवाद कमी आलेत, पण ती एकेक गोष्टींवर रिऍक्‍शनमधून जे बोलत जाते ते विलक्षण आहे. तिच्या नजरेतून आपण हा सगळा "शिनेमा' बघतो, त्यामुळं तिची नजर खूप महत्त्वाची. मुक्तानं हे अवघड काम अगदी सहजपणे पार पाडलंय . शिवराज वायचळनं एफर्टलेस पद्धतीनं भूमिका साकारली आहे. कुठंही आव न आणणारा त्याचा साधा नायक छान आहे. ऋचा इनामदार अतिशय उत्फुल्ल, नैसर्गिक अभिनय करणारी. तिची अंगभूत ऊर्जा तिची व्यक्तिरेखा विलक्षण खुलवते.

भाऊ कदम, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे या मंडळींनी विलक्षण मजा आणली आहे. या कलाकारांची स्वतःची अशी वैशिष्ट्यं आहेत. त्यांचा चपखल वापर दिग्दर्शकानं केला आहे. शिवाजी साटम, सुनील बर्वे हे अतिशय छान. आश्विनी काळसेकर, अलका कुबल यांनी भूमिकेची नस बरोबर ओळखली आहे. प्राजक्ता हनमघर, योगिनी पोफळे अगदी छोट्या प्रसंगांतही ठसा उमटवून जातात.

एकुणात, हा चित्रपट म्हणजे एक छान प्रसन्न अनुभव आहे. कोणत्याही रुढ जॉनरमध्ये न बसणारा आणि सहकुटुंब आनंद घ्यावा असा. ऑकवर्ड करणारे कोणतेही प्रसंग, नकारात्मक व्यक्तिरेखा त्यात नाहीत आणि निरीक्षणांची, मांडणीची एक छान गंमत त्यात आहे. त्यामुळं हा "शिनेमा' नक्कीच बघायला हवा.

रेटिंग : साडेतीन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Movie Wedding Cha Shinema