esakal | बंडल 'तांडव', कथेवर नव्हे अभिनयावर तरलेला सत्तेचा 'नाटकी' पट 

बोलून बातमी शोधा

review of Tandav web series one time watch serise not so good }

नव्यानं प्रदर्शित झालेल्या तांडव विषयी सांगायचे झाल्यास या मालिकेविषयी अनेकांना फार उत्सुकता होती. पण...

बंडल 'तांडव', कथेवर नव्हे अभिनयावर तरलेला सत्तेचा 'नाटकी' पट 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ब-याचवेळा कलाकृतीत आशयात्मकदृट्या काही दम नसल्यास मग जे काही तयार केलं आहे ते प्रेक्षकांच्या माथी मारण्यासाठी वादाची मदत घेतली जाते. त्यात माणूस, त्याची जात, धर्म, संस्कृती, परंपरा, चालीरीती यासगळ्याचा समावेश केला जातो. उद्देश फक्त एकच तो म्हणजे काही करुन आमचा चित्रपट किंवा मालिका प्रेक्षकांनी पाहायला हवी. अनेकदा आपण जे सोशल मीडियावर दरवेळी एखादा चित्रपट प्रदर्शित व्हायच्यावेळचे वाद पाहतो तेव्हा ते मँनेज असते की काय अशी शंका यायला लागते.

नव्यानं प्रदर्शित झालेल्या तांडव विषयी सांगायचे झाल्यास या मालिकेविषयी अनेकांना फार उत्सुकता होती. त्यात असणारी तगडी स्टारकास्ट यामुळे मालिकेकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच. ज्यांनी ही मालिका पाहिली त्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यांनी या मालिकेला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकतर त्यात दाखविण्यात आलेला आशय हा धार्मिक भावना दुखावणारा आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. दुसकीकडे आहे त्या कथानकाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही धार्मिक संघर्ष उभे करण्याचे काम दिग्दर्शकानं केले आहे. थोडक्यात फार मोठ्या अपेक्षा ठेवून ही मालिका पाहत असाल तर तुम्ही कमालीचे धाडसी आहात असे म्हणावे लागेल.

मालिकेची कथा सारांश रुपानं अशी आहे की, सगळा खेळ पंतप्रधानाच्या खुर्चीसाठीचा आहे. आतापर्यत दोन वेळा पंतप्रधान असलेल्या देवकी नंदन यांना तिस-यांदा सत्तेत यायचे आहे. मात्र अचानक त्यांचा मृत्यु होतो. आणि त्यानंतर त्यांच्या मुलाला समरला त्या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. पण हा खेळ इतका काही सोपा नाही. राजकारण दिसते तसे नसते याचा अंदाज समरला बांधता येत नाही. तो वेगवेगळ्या अमिषांना फसत जातो. नात्यांच्या गुंत्यात तो अडकतो आणि त्या पदाला नाकारतो. त्यामुळे सगळे बुचकाळ्यात पडतात. हा असे का करत आहे. समरच्या मनात नेमकं काय चालले आहे हे कळण्यासाठी मालिका पाहावी लागेल.

पंतप्रधान कोण होणार यासाठी सगळा आकांडतांडव चाललं आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मालिका पाहावी लागते. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे सध्या 9 भाग प्रदर्शित झाले आहेत. राजकीय डावपेच, कट कारस्थाने, पाताळयंत्री माणसे, त्यांचे स्वार्थ, सत्ता पिपासू मित्र. आपलीच रक्ताची माणसेही जेव्हा सत्तेसाठी विश्वासघात करतात तेव्हा काय करायचे असा प्रश्नही या मालिकेच्या निमित्तानं उपस्थित होतो. या मालिकेत एकीकडे पंतप्रधान पदाकरिता संघर्ष आहे दुसरीकडे एका विद्यापीठातील अंतर्गत वाद, जातीच्या नावाखाली चाललेलं राजकारण, तरुणांची डोके भडकविण्याचे चालेललं काम 'तांडव' मध्ये पाहायला मिळतं. 

‘कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का?’; तांडव पाहू नका

तांडवच्या कथेत काही दम नाही. हे सांगावे लागेल. त्यात केवळ दमदार स्टारकास्ट आहे म्हणून तो पाहावासा वाटतो. बाकी सगळा आनंद आहे. अशक्त कथा सशक्त अभिनयाच्या जोरावर सैफ अली खान, मोहम्मद जिशान आयुब, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांनी उचलून धरली आहे. प्रख्यात अभिनेता आणि दिग्दर्शक तिंग्मांशु धुलिया यांच्या वाट्याला फारसे प्रसंग नाही. मात्र जेवढा काळ ते स्क्रिनवर दिसतात तेव्हा छाप उमटवून जातात हे नक्की.