esakal | अभिनेता रितेश देशमुखचा आपल्या मुलांसोबतचा 'हा' फोटो होतोय तुफान व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता रितेश देशमुखचा आपल्या मुलांसोबतचा 'हा' फोटो होतोय तुफान व्हायरल

सध्या रितेशचा आपली मुले रिआन व राहील यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो आपल्या मुलांना माती, नीती, संस्कृतीचे शिक्षण देताना दिसत आहे.

अभिनेता रितेश देशमुखचा आपल्या मुलांसोबतचा 'हा' फोटो होतोय तुफान व्हायरल

sakal_logo
By
सागर दिलीपराव शेलार

पुणे : मुलांवरती बालवयात जे संस्कार होतात तेच आयुष्यभर कायम राहतात. त्यामुळे मुलांची जडणघडण ही बालवयातच होत असते. याच कारणास्तव पालक बालवयातच मुलांना माती, नीती, संस्कृतीबाबत शिक्षण देतात. तसेच त्याच प्रकारचे संस्कार आपल्या पाल्यावर करतात. अशाच प्रकारचे संस्कार प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आपल्या पाल्यांवर करताना सध्या दिसतो आहे. त्याचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रितेश देशमुख हा महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याचा मुलगा तर आहेच, पण तो चांगला अभिनेता देखील आहे. तो दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. त्याचे दोन भाऊ राजकारणात सक्रिय आहेत. त्याचे अनेक चित्रपट बाॅलिवूडमध्ये चांगलेच गाजले आहेत.

रितेशचा जन्म लातूरमधील बाभळगाव या गावी झाला. विलासराव देशमुख व वैशाली देशमुख यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेश यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख हे महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, तसेच छोटे बंधू धीरज देशमुख हे देखील आमदार आहेत.

रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे. तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जि. डी. सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय, मुंबई या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या जेनेलिया डिसुझा यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिस्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते जेनेलिया यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. 

जेनेलिया या अभिनेत्री असून, त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. रितेश यांच्या दोन्ही वहिनी आदिती घोरपडे (आदिती अमित देशमुख) व दीपशिखा भगनानी (दीपशिखा धीरज देशमुख) या देखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वतः निर्मात्या असून, सुप्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांच्या त्या कन्या आहेत. रितेश आणि जेनेलिया यांना २ अपत्य असून, रिआन व राहील अशी त्यांची नावे आहेत.

सध्या रितेशचा आपली मुले रिआन व राहील यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो आपल्या मुलांना माती, नीती, संस्कृतीचे शिक्षण देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो आपल्या मुलांना बाजरीच्या कणसामधून धान्य कसे तयार होते याची माहीती देत आहे. हा फोटो शेअर करताना यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ''लेकरांसाठी हेही संस्कार महत्वाचेच...
भाकरी खायला गोड लागते पण निर्मिती प्रक्रिया विचारल्यास हीच नवपिढी निःशब्द होते..'' त्यामुळेच की काय रितेश आपल्या मुलांची बालवयातच माती, नीती, संस्कृतीशी नाळ पक्की करवून घेत आहे. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोस मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळत आहेत.  

दरम्यान, २००३ सालच्या चित्रपट तुझे मेरी कसमद्वारे रितेश यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला मस्ती या चित्रपटापासून त्यांना व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाउसफुल, डबल धमाल, तेरे नाल लव हो गया, हाउसफुल २, क्या सुपर कुल है हम, ग्रॅंड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.