कोल्हापूरचे कलासंस्कार क्षणोक्षणी उपयोगी

शिवाजी यादव
बुधवार, 3 एप्रिल 2019

कोल्हापुरात झालेल्या कलासंस्काराचे बीजारोपण महत्त्वाचे वाटते. म्हणूनच मुंबईच्या चंदेरी दुनियेत कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.. अभिनेता रोहित हळदीकर यांनी कोल्हापूरविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. 

शाळकरी वयात काका संजय हळदकर यांच्यासोबत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या विंगेतून त्यांची अनेक नाटकं बघितली. पुढे नाटकांची आवड लागली. भालजी पेंढारकर कला अकादमीत अभिनयाचे शिक्षण घेतलं. तिथे कोल्हापूरच्या चित्रपट कलेचा इतिहास समजून घेता आला. गायन समाज देवल क्‍लबच्या संगीत गायन परंपरेची ओळख झाली. पुढे व्यावसायिक रंगभूमी ते चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली. या सर्व प्रवासात माझ्यावर कोल्हापुरात झालेल्या कलासंस्काराचे बीजारोपण महत्त्वाचे वाटते. म्हणूनच मुंबईच्या चंदेरी दुनियेत कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.. अभिनेता रोहित हळदीकर यांनी कोल्हापूरविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. 

कोल्हापूरला हौशी, प्रायोगिक रंगीभूमीवर सतत नाटकं सादर होतात, ती पाहिली. याशिवाय राज्य नाट्य स्पर्धा व एकांकिका स्पर्धांत सहभाग घेतला. मुंबईत गेलो, तिथे नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘हीच तर प्रेमाची गंमत’ हे नाटक करण्यास दिले. पुढे अभिनेता जितेंद्र जोशीसोबत ‘दोन स्पेशल’ अभिनेता, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांचे ‘शेक्‍सपियरचं नाटक’ अशा तीन व्यावसायिक नाटकांत काम केले. या काळात संवादफेकीतील जादुई नजाकत काय असते, हे समजत गेले.

शब्द, आवाजातील बदल, चढ-उतार, अचूक टायमिंग या गुणवैशिष्ट्यांशी गट्टी पक्की झाली. यातून अशोककुमारांपासून शाहरूख खानपर्यंतच्या अनेक कलावंतांचा आवाज काढू लागलो. बदलत्या आवाजातील गमतीजमती ‘कार्टुन फिल्मसाठी’ वापरता आल्या. आज अनेक ‘कार्टुन शो’मधील विविधांगी आवाज माझे आहेत. त्या आवाजाला रसिकांची मिळणारी दाद म्हणजे कोल्हापुरात जी नाटकं केली, त्यातून जे शिकलो, त्यासाठी आहे.

गेल्या तीन वर्षांत ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पार्टी’ ‘डोक्‍याला शॉट’ या चित्रपटात चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. तीन मालिका झाल्या. मुंबईत स्थिरस्थावर आहे. कोल्हापूरच्या कलानगरीने माझ्यावर बालपणी केलेले कलासंस्कार मला इथे क्षणोक्षणी उपयोगी पडतात, असेही श्री. रोहित यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Haldikar interview for Mazha Kolhapur