
रोहित शेट्टी थेट 'उल्हासनगर'मध्ये, कारण...
बॉलिवूडमध्ये अॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी.सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये चर्चा आहे ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची. दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टीचा हा मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित झाला. तर एकीकडे देशभरामध्ये या चित्रपटाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे रोहित एका खास कारणासाठी थेट आपल्या गाडीने मुंबईहून उल्हासनगरला प्रवास करत एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी गेला. आता या भेटीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानी याला रोहितने भेटण्याचं वचन दिलं होतं. काही दिवसांपूर्वी रोहितने आशिषला मी तुला भेटण्यासाठी नक्की उल्हासनगरमध्ये येईल, असा शब्द दिला होता. हेच वचन पूर्ण करण्यासाठी रोहित थेट आशिषच्या घरी पोहचला. रोहित त्याच्या लॅण्ड रोव्हर गाडीमधून त्याच्या घरी पोहचला. रोहितच्या गाडी पुढे आणि मागे पोलिसांच्या कार होत्या. चिंचोळ्या गल्ल्यांमधून रोहितची गाडी आशिष राहतो त्या इमारतीच्या गेटमधून आत शिरली तेव्हा रोहितला पाहण्यासाठी इमारतींच्या बाल्कन्यांमध्ये स्थानिकांनी मोठी गर्दी जमली होती.
आशिषने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला,“एका खोलीमध्ये बसून व्हिडीओ बनवण्यापासून ते थेट रोहित शेट्टीला उल्हासनगरमध्ये आणण्यापर्यंत… आयुष्य हे अनेक चमत्कारांनी भरलेलं असतं. आज माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी फारच भावनिक दिवस होता. काय छान दिवस होता हा. दिलेला शब्द पाळल्याबद्दल धन्यवाद रोहित शेट्टी. तू जगातील कोणत्याही ठिकाणाला भेट देऊ शकतोस पण तू माझ्या घरी भेट देण्याचा निर्णय घेतला. तू लोकांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नात्याची खूप काळजी घेतो. त्यामुळेच खूपजणं तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला सन्मान देतात,” असं आशिषने कॅप्शन देतं व्हिडीओ पोस्ट केला.