रोमानियातील रोचक थरारपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Interesting

रोमानियातील रोचक थरारपट

फेलॉश या फ्रेंच गीतकाराचे ‘सिल्बो’ नावाचे एक गाणे आहे. या गाण्यातील ओळींचं स्वैर भाषांतर करायचे झाल्यास, ‘अशी एक जागा आहे, जिथं माणसं पक्ष्यांप्रमाणे संवाद साधतात… गोमेराच्या बेटांवर सिल्बोचा आवाज घुमत राहतो…’ असे तो गातो. आता या गाण्याचा आणि या लेखाचा संबंध काय, असे तुम्ही म्हणाल, तर त्याचं कारण आहे ‘द व्हिसलर्स’ हा चित्रपट. कॉर्नेलिऊ पोरूम्बोयु या रोमानियन दिग्दर्शकाच्या या चित्रपटात ‘सिल्बो’ या भाषाप्रकाराला फार महत्त्व आहे.

स्पेनमधील गोमेरा बेटांवरील ही भाषा स्पॅनिश भाषेमधील शब्दांचे स्वरांतरण आहे. म्हणजे, ही भाषा बोलली जाते ती फक्त शिट्यांच्या माध्यमातून! फेलॉशच्या गाण्यातील उल्लेखाप्रमाणे ‘सिल्बो’ आणि पक्ष्यांच्या आवाजात खरोखर साम्य आहे. ज्यात गोमेरातील डोंगर-दऱ्यांचा विचार करता अगदी चार-पाच किलोमीटर अंतरावरील व्यक्तीशी सहजरीत्या संवाद साधणे शक्य होते. ‘द व्हिसलर्स’च्या नावापासूनच ‘सिल्बो’ला चित्रपटात किती महत्त्व आहे, हे लक्षात येऊ शकते.

चित्रपटाचा नायक क्रिस्टी (व्लाड इवानोव) हा एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे. त्याच्या भ्रष्ट कारभारामुळे तो अवैध व्यवहार आणि पोलिसांच्या मध्ये अडकला आहे. त्याचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारीदेखील त्याच्याइतकेच भ्रष्ट असले तरी कुठलीही व्यवस्था अशा पद्धतीने काम करीत असते की, अनेकांना वाचवायचे झाल्यास कुणाचा ना कुणाचा बळी द्यावा लागतो. चित्रपट सुरू होतो तेव्हा क्रिस्टीला निलंबित किंवा अटक केलेले नसले, तरी पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून असतात. पोलिस आणि अवैध धंदे करणाऱ्या लोकांच्या शीतयुद्धात टिकून राहण्यासाठी गुप्त पद्धतीने संभाषण करणे गरजेचे असते. त्यासाठी गोमेरामध्ये जाऊन ‘सिल्बो’मध्ये संवाद साधण्याचे कसब क्रिस्टीला अवगत करावे लागणार असते.

क्रिस्टीच्या आयुष्यातील आणखी एक समस्या म्हणजे, तो इथल्या खलपात्राच्या प्रेयसीकडे आकर्षित झालेला आहे. गिल्डाकडे (कट्रिनेल मार्लन) आकर्षित झालेला, मात्र त्याविषयी काहीच करू न शकणारा, वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करीत असलेला क्रिस्टी हा हताश एकतर्फी प्रियकराचे चांगले उदाहरण आहे. याखेरीज व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अवैध धंदे आणि दगाबाजी आणि मृत्यूची टांगती तलवार अशा इतर गोष्टींमुळेही चित्रपटात एक निश्चल निराशावाद अस्तित्वात आहे.

दिग्दर्शक पोरूम्बोयु, छायाचित्रकार तुदोर मिर्चा आणि इतर तंत्रज्ञ-कलाकार दृश्य स्तरावर फारच सुंदर व रंगीबेरंगी दिसणारी कलाकृती समोर मांडतात. ज्यातून दृश्य स्तरावर दिसणारे अनेकविध रंग आणि संकल्पनेच्या स्तरावरील निराशावादी दृष्टिकोन यांचा रोचक मिलाफ पाहायला मिळतो. याचा अर्थ चित्रपट फार गंभीर आहे, असा नाही. कारण, इथल्या परस्परविरोधी संकल्पना, लेखक-दिग्दर्शकाचा सर्व गोष्टींकडे उपरोधिकरीत्या पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे ‘द व्हिसलर्स’ प्रचंड रंजक ठरतो. याखेरीज इथल्या कथेतील संवाद-विसंवादामध्ये ‘सिल्बो’ला महत्त्व असल्याने माणसांनी शिट्या वाजवत काढलेले सुमधुर आवाज ऐकायला मिळतात.

‘द व्हिसलर्स’ हा चित्रपट पाहण्याची अनेक कारणे सांगता येतील. ज्यात पोरूम्बोयुचे दिग्दर्शन, मिर्चाचे छायांकन यापासून ते चित्रपटात विविध गीत-संगीताच्या केलेल्या वापरापर्यंत अनेक बाबींचा समावेश असेल. मात्र, याहून महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटात ‘सिल्बो’ या दुर्मिळ भाषाप्रकाराचे, गोमेरामधील सुश्राव्य संस्कृतीचे डॉक्युमेंटेशन झाले आहे. दिग्दर्शक पोरूम्बोयुने हे सारे प्रभावीपणे सादर केले असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे.