कलापूरनं नसानसांत बिंबवलं तालसौंदर्य...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

खरं तर कलापूरनंच नसानसांत तालसौंदर्य बिंबवलं आणि त्या बळावरच आता या क्षेत्रात आणखी बरेच काही करायचं आहे...युवा वादक ऋषीकेश देशमाने संवाद साधत असतो आणि त्याचा प्रवास उलगडत राहतो. 

मी रहायला कदमवाडी रोडवरील शिवराज कॉलनीत. विवेकानंद कॉलेजला असताना युवा महोत्सवात सहभागी होऊ लागलो आणि बक्षिसांची लयलूट, हे समीकरणच बनलं. मुंबई विद्यापीठाच्या लोककला ॲकॅडमीतून ‘मास्टर्स इन फोक आर्ट’ ही पदवी घेतली आणि या क्षेत्रात यशाचा एकेक टप्पा पार करत पुढे चाललो आहे. खरं तर कलापूरनंच नसानसांत तालसौंदर्य बिंबवलं आणि त्या बळावरच आता या क्षेत्रात आणखी बरेच काही करायचं आहे...युवा वादक ऋषीकेश देशमाने संवाद साधत असतो आणि त्याचा प्रवास उलगडत राहतो. 

कोल्हापुरातील सोंगी भजन परंपरा आणि सुनील देशमाने हे एक अतूट समीकरण. ऋषीकेश त्यांचाच मुलगा. त्याचं शालेय शिक्षण जय भारत हायस्कूलमध्ये झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये. झूलॉजीमध्ये बीएसस्सी केल्यानंतर त्यानं मुंबई गाठली.

मात्र, दरम्यानच्या काळात गंधर्व महाविद्यालयातून तो तबला विशारदही झाला. अनेक युवा महोत्सवातून महाविद्यालयाचे, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवातून तो चमकू लागला. महोत्सवातला ‘गोल्डन बॉय’ हा किताबही त्यानं पटकावला.

पुढे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून ईस्त्रायल येथे झालेल्या सुवर्ण युवा शोमध्येही त्याचा सहभाग होता. विजय जाधव, राजाराम जामसांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं विविध महाविद्यालयांच्या लोकवाद्यवृंदासाठी दिग्दर्शनही केलं आणि त्यातही बक्षिसांची लयलूट केली. ‘एकदम कडक’, ‘संगीतसम्राट’ आणि ‘शिंदेशाही तोडा’ या रिॲलिटी शोमध्येही त्यानं बहारदार वादन केलं. त्याचा ‘ताल उत्सव’ हा कार्यक्रम आजही अनेकांना भुरळ घालतो. त्याचे प्रयोग यापूर्वीही झाले आणि अजून होतीलही. पखवाज, ढोलकी, ढोल, डफ, हलगी, ताशा, संबळ, दिमडी, चौंडकं, टाळ, डमरू, तुतारी, तुणतुणं... अशा पंधरांहून अधिक लोकवाद्यांची ही अनोखी जुगलबंदी अफलातूनच.

महेश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं हा कार्यक्रम तयार केला. देशभरातील तालवाद्ये तो आता या कार्यक्रमात आणणार आहे. ऋषीकेश सांगतो, ‘‘शिक्षणानंतर आता करिअर म्हणून या क्षेत्रात नाव करायचं आहे आणि ते नक्कीच करून दाखवेल. कारण जे काही कराल ते झपाटून आणि प्रामाणिकपणे केल्यास यशोलौकिकाचं शिलेदार नक्कीच होता येतं, हा संस्कार कोल्हापूरनंच आमच्या पिढीत रुजवला आहे.’’

करिअर म्हणून तर आहेच; पण हलगी, ढोलकी, डफ अशा लोकवाद्यांचे सोलो कार्यक्रम कधीच होत नाहीत. अशा लोकवाद्यांना सन्मान मिळाला पाहिजे आणि आपली लोककला आपण अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच त्यामागची प्रामाणिक भावना आहे.
- ऋषीकेश देशमाने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushikesh Deshmane interview in Amhi Kolhapuri