दिल, दोस्ती : ‘बॅकबोन’ आणि ‘दैवी व्यक्ती’!

अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यांची जोडी कमालीची हिट झाली.
rutuja bagave and chinmay uadgirkar
rutuja bagave and chinmay uadgirkarsakal
Summary

अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यांची जोडी कमालीची हिट झाली.

- ऋतुजा बागवे, चिन्मय उदगीरकर

अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यांची जोडी कमालीची हिट झाली. मागील सहा वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना ओळखतात. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेच्या लुक टेस्टच्या वेळेस त्यांची पहिली भेट झाली. ‘सुरवातीला आम्ही एकमेकांसाठी अनोळखी होतो. त्याच दोन अनोळखी व्यक्ती आज एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. तेव्हापासूनच्या मैत्रीचा आमचा प्रवास अजूनही सुरू आहे,’’ असं ऋतुजानं सांगितलं. ऋतुजाच्या या म्हणण्याला चिन्मयनंदेखील दुजोरा दिला

ऋतुजाच्या स्वभावाबद्दल चिन्मयनं सांगितलं, ‘ती सडेतोड आणि बिनधास्त मुलगी आहे. तुम्ही तिच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवू शकता. तिच्या कामाबद्दल, जवळच्या माणसांबद्दल ती नेहमीच प्रामाणिक असते. तिच्याकडं खूप सहनशक्ती, फायटिंग स्पिरीट आहे. तिला चॅलेंज दिल्यास ती जोशात स्वीकारून ते पूर्ण करते. यासाठी मी नेहमीच तिचं कौतुक करतो. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यामागं तिची मेहनत, जिद्द कौतुकास्पद आहे. ती अतिशय संवेदनशील आणि खरी आहे. तिनं एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं, तर त्याच्यासाठी ती काहीपण करू शकते. असंच ती कामाच्या बाबतीत देखील करते. अतिशय मन लावून, स्वतःला झोकून देऊन ती काम करते. तिला खोटं वागणं, उगाचच चांगलं चांगलं बोलणं आवडत नाही. मनात असतं, तेच ती बोलते. हीच पारदर्शकता ती आपल्या कामामध्ये देखील उपयोगात आणते.’’

चिन्मय माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून कसा आहे, असं विचारल्यावर ऋतुजानं सांगितलं, ‘चिन्मय मानसिकदृष्ट्या अतिशय खंबीर आहे. तो ध्यान धारणा खूप करतो. प्रत्येक गोष्ट अतिशय उत्तमरीत्या सांभाळतो. त्याला त्याच्या डाएट आणि वर्कआउटमध्ये खंड पडलेलं चालत नाही. सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणं त्याला आवडतं. तो अतिशय खोडकर ही आहे, मात्र कधी कधी तो शांत देखील असतो. सुरवातीला तो थोडा चिडखोर होता, मात्र आता त्यानं आपल्या रागावर नियंत्रण मिळवले आहे. सगळ्या गोष्टी त्याला वेळच्या वेळी करायला फार आवडतात. तो सेटवर येताच अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं. मात्र, काम करण्याच्या वेळेस अतिशय फोकस्ड असतो. तो त्याच्या भूमिकांना उत्तमरीत्या न्याय देतो. जसा तो खऱ्या आयुष्यात आहे, तसाच तो पडद्यावर देखील वावरतो. तो प्रत्येकाला नेहमीच स्वतःच्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न करतो. असं कधीही झालेले नाही, की आपण चिन्मयकडं काही प्रॉब्लेम घेऊन गेलो आहोत आणि त्यानं त्यावर काही मार्ग काढलेला नाही. कोणालाही मदत करायला तो नेहमीच तत्पर असतो. त्याच्यातील हा खरेपणा मला नेहमीच आवडतो.’’

चिन्मयमधली अशी कोणती गोष्ट आहे, जी तू स्वतःमध्ये आत्मसात करशील, यावर ऋतुजा म्हणाली, ‘त्याची मेंटल हेल्थ कमालीची आहे. मला त्याच्या इतकं मेंटली स्ट्रॉंग व्हायचं आहे.’ तर, एखाद्याच्या विरोधाला सामोरे जाऊन त्याला कसं हाणून पडायचं, आपण कसे बरोबर आहे, हे सिद्ध करायचे हे चिन्मयला ऋतुजाकडून शिकायचं आहे.

चिन्मयची कोणती भूमिका आवडते यावर ऋतुजानं सांगितलं, ‘मी स्वतः नाटकात काम करते म्हणून मलासुद्धा त्याला नाटकात काम करताना पाहिल्यावर आनंद होतो. त्यानं नाटकात केलेलं प्रत्येक काम मला आवडतं.’ चिन्मयनं सांगितलं, ‘ऋतुजाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये वेगळेपणा आहे. तिची प्रत्येक भूमिका वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक भूमिकेतून ती मला नव्यानं उलगडत जाते.’ आम्हाला माणसांना दुखवायला आवडत नाही हा आमच्यामधील एकसारखा गुण आहे. ऋतुजानं चिन्मयचं ‘माय बॅकबोन’ असं वर्णन केलं, चिन्मयनं ‘देवानं पाठवलेली खास व्यक्ती,’ असं ऋतुजाचं वर्णन केलं. आम्ही असेच एकमेकांसोबत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये सोबत राहू असे दोघांनी सांगितले.

(शब्दांकन - जान्हवी वंजारे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com