अभिनयात मुरलेले सचिन... 

तेजल गावडे  
गुरुवार, 27 एप्रिल 2017

विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत... 

विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत... 

"एक थी रानी ऐसी भी' चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित होणार होता, तर प्रदर्शनाला इतका उशीर का झाला? 
- विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गुलबहार सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या विषयाचे संशोधन गुलबहार सिंग यांनीच केले; तसेच सध्याच्या गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांच्या "राजपथ ते जनपथ' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. यावरील संशोधनामुळे प्रदर्शनाला उशीर झाला; तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी विनोद खन्ना यांची तब्येतही बरी नव्हती. त्यांची या चित्रपटातील शिवाजीराजे सिंधियाचा रोल साकारण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांनी वेळ देऊन चित्रपट गेल्या वर्षी पूर्ण केला. 

"एक थी रानी ऐसी भी' चित्रपटाची कथा काय आहे? 
- "राजपथ ते जनपथ' या पुस्तकात विजया राजे सिंधिया यांचा जीवनपट खूपच प्रभावी पद्धतीने मांडला आहे. राणीचे प्रजेवर खूप प्रेम असते आणि तितकेच प्रेम प्रजा राणीवर करणारी असते; पण आणीबाणीनंतर मुलांमध्ये वितुष्ट निर्माण होते आणि घरात दोन पक्ष तयार होतात. इथूनच संघर्षाला सुरुवात होते, अशी चित्रपटाची कथा आहे. मी सरदार आंग्रे यांचा मुलगा बाळ आंग्रे यांची भूमिका साकारली आहे. 

हेमा मालिनी व विनोद खन्ना यांच्यासोबतच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? 
- या चित्रपटाच्या निमित्ताने हेमाजी आणि विनोदजींसोबत काम करण्याची मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. हेमाजी व विनोदजी किती हाडाचे कलावंत आहेत ते प्रकर्षाने जाणवले. त्यांचा शॉट बघताना वाटायचे की, यासाठीच ही माणसे जन्माला आली आहेत. इतका त्यांच्यातला कलाकार जिवंत आहे. हे पाहून मला त्यांचे खूपच कौतुक वाटले. 

"मुरांबा' या आगामी चित्रपटाबद्दल काय सांगाल? 
- हा कौटुंबिक चित्रपट असून, खूप छान मनोरंजक चित्रपट झाला आहे. या चित्रपटाचे वरूण नार्वेकर दिग्दर्शक आहेत. मी, अमेय वाघ, मिथिला पालकर आणि चिन्मयी सुमित अशी कलाकार मंडळी यात आहोत. 

नुकतेच तुम्ही वेब चॅनेलवर या चित्रपटाचे प्रमोशन केले, त्याबद्दल काय सांगाल? 
- भारतीय डिजिटल पार्टी या वेब चॅनेलवर आम्ही या चित्रपटाचे प्रमोशन केले. चित्रपटाचा गाजावाजा करण्यासाठी आठ मिनिटांचा व्हिडीओ केला होता. वेबवर प्रेक्षकांना त्यांच्या वेळेत कार्यक्रम पाहता येतात. त्यामुळे मला वाटते नजीकच्या भविष्यात वेब हे मोठे माध्यम ठरणार आहे. 

अमेय वाघ व मिथिल पालकर यांच्याबद्दल काय सांगाल? 
- या दोघांना पाहून मला वाटते की, त्या वयात मी इतका हुशार नव्हतो किंवा इतके मला काम येत नव्हते. आज त्यांना बघून असे वाटते की, त्यांच्याकडे खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. 

आगामी प्रोजेक्‍ट्‌सबद्दल सांगा? 
- हिंदी चित्रपट "गोलमाल 4' चे चित्रीकरण हैद्राबादला सुरू आहे आणि "जुडवा 2' चित्रपटात काम करणार आहे; तसेच दोन मराठी चित्रपट आहेत. "टेक केअर गुडनाईट' असे एका चित्रपटाचे नाव आहे. ज्याचे दिग्दर्शन गिरीश जोशी यांनी केले आहे. या वर्षी कान्सला राज्य सरकारतर्फे त्याची एन्ट्री झाली आहे; तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित "कच्चा लिंबू' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Khedekar interview