ढिंच्यॅक सचिन पिळगांवकर सोशल मिडियावर ट्रोल...

Sachin Pilgaonkar Troll on social media
Sachin Pilgaonkar Troll on social media

मुंबई- 'आमची मुंबई-द मुंबई अँथम' या गाण्यामुळे मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. या व्हिडिओवरुन त्यांना सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीच्या 'शेमारू बॉलीगोली' या अकाउंटवरून 'आमची मुंबई-द मुंबई अँथम' नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मुंबईतील जीवनशैलीवर आधारित असलेले हे गाणे सचिन पिळगांवकर यांनीच गायले आहे. मात्र गाण्याची शब्दरचना, संगीत आणि विनोदी प्रकारे चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नेटीझन्सनी ट्रोल केले आहे.

'जेवायला बसलो होतो, भूक लागली होती खूप...हा व्हिडिओ पाहून जेवण्याची आणि जगण्याची इच्छाच मेली', '90 च्या दशकात व्हिडियो शूट झाल्या सारख वाटत', 'आणि अश्या रीतीने डिंच्याक पूजाला मराठी माणसाकडून टफ कॉम्पिटेशन', 'ले ले ले ले मुंबई का...... नंतर इतका पॉज! मला तर घाम फुटला', अशा आशयाच्या कमेंट नेटीझन्सनी सोशल मिडीयावर टाकून सचिन पिळगांवकर यांना ट्रोल केले आहे.

मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावरुन ट्रोल होत आहे हे लक्षात आल्यावर सचिन पिळगांवकर यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न  केलेला दिसतो. फेसबुक पोस्टमधून त्यांनी यासंदर्भात सांगताना हा व्हिडीओ खूप वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आला होता असे सांगतानाच पुन्हा मी अशा परिस्थितीमध्ये सापडणार नाही यासाठी देवाकडे प्रार्थना करतो असेही म्हटले आहे. या पोस्टमध्ये पिळगांवकर म्हणतात, नुकताच सोशल मिडीयावर रिलीज झालेला माझा एक व्हिडीओ बराच चर्चेचा विषय झाला आहे. काहींना हसू आलं काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्या विषायीच्या प्रेमापोटी असं रडू आलं, त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो. एवढंच सांगेन की तुम्हाला जसं वाईट वाटलं, तसं मलाही वाटलं. मात्र हा व्हिडीओ आपण कोणत्याही लालसेपोटी केला नसल्याचे सांगताना, आम्ही कलाकार मंडळी बऱ्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर करत असतो. कधी कुणाच्या दुकानाचं उद्घाटन कर, तर कधी एखाद्या ध्वनिफितिचं अनावरण करण्यासारखी मदत करतो असेही त्यांनी नमूद केले.

पुढे या व्हिडीओबद्दलची माहिती देताना त्यांनी हा अनेक वर्षांपूर्वीचा व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओच्या निर्मितीबद्दलची कहाणी सांगितली आहे. हा व्हिडीओ पाहून वाईट वाटल्याचे सांगतानाच, आज मी कायदेशीररित्या किंवा कायद्याच्या मदतीने हा व्हिडिओ नक्कीच काढून टाकायला लावू शकतो. परंतु, मी तसं करणार नाही. कारण, माझ्या मित्राचा किंवा आताच्या निर्मात्यांचा, कुणाचाही हेतू काही वाईट करण्याचा नव्हता, याची मला खात्री आहे. मग, केवळ आपली आवड त्यांच्यावर लादण्याइतकी लोकशाहीची गळचेपी मी कशी करु? असा सवाल पिळगांवकर यांनी त्यांच्या चाहत्यांना केला आहे.

पोस्ट संपवताना ते म्हणतात, शेवटी एवढंच सांगेन की, चूक असती तर माफी मागून पुन्हा करणार नाही म्हटलं असतं. पण, एखाद्या दुसऱ्या अशा कटू अनुभवामुळे मित्रांसाठी चांगुलपणा दाखवायची चूक करणे मी नक्कीच थांबवणार नाही. मग, तुम्ही आणि मी काय करु शकतो? एवढंच की अशा परिस्थितीत मी पुन्हा पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना !, असे सागंतानाच शेवटी अशी प्रार्थना तुम्ही प्रेक्षक आणि माझे हीतचिंतक म्हणून नक्की कराल याची मला खात्री आहे अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

तो व्हिडीओ काढून टाकला...
सचिन पिळगांवकर यांनी फेसबुक पोस्टमधून आपण हा व्हिडीओ काढायला सांगणार नसल्याचे म्हटले होते परंतु, युट्यूबवरून हा व्हिडीओ काढण्यात आला आहे.

व्हिडीओ काढल्यानंतरही मोठ्या प्रमाणात ट्रोल...
सचिन पिळगांवकर यांनी हा व्हिडीओ काढल्यानंतरही नेटीझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. 'म्हाग्रु ने video काढला youtube वरून', 'महागुरुचा नुकताच प्रदर्शित झालेला मुंबईवरचा व्हिडिओ युवट्युब वरच्या रसिकांच्या अफाट कौतुकामुळे काढून टाकण्यात आला आहे. कमेंट वाचून येडा झाला महाग्रु', 'कसले दुष्ट लोक्स आहात रे तुम्ही सारे.... स्वतः मजा लुटली आणि आमचा एंटरटैन व्हायचा चान्स येईतो विडिओ गायब करायला लावला.... तुमचा सर्वांचा निषेध...', तो व्हिडीओ काढल्यानंतर अशा आशयाच्या कमेंटही फेसबुकवर नेटीझन्सनी दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com