दिल, दोस्ती : मैत्रीचा घट्ट बॉण्ड

मालिकेच्या निमित्तानं कलाकारांची ओळख होते आणि दिवसातले ८-१० तास एकत्र काम करत असल्यानं त्यांच्यात खास नातं तयार होतं.
sai ranade and samidha guru
sai ranade and samidha guruSakal
Summary

मालिकेच्या निमित्तानं कलाकारांची ओळख होते आणि दिवसातले ८-१० तास एकत्र काम करत असल्यानं त्यांच्यात खास नातं तयार होतं.

- सई रानडे, समिधा गुरू

मालिकेच्या निमित्तानं कलाकारांची ओळख होते आणि दिवसातले ८-१० तास एकत्र काम करत असल्यानं त्यांच्यात खास नातं तयार होतं. मालिका संपल्यावर हे कलाकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी होतात, पण काहींचा तो मैत्रीचा बॉण्ड घट्टच राहतो. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री सई रानडे आणि समिधा गुरू. त्यांची दहा वर्षांपूर्वी देवयानी मालिकेदरम्यान मैत्री झाली आणि आजतागायत ती तशीच टिकून आहे.

समिधानं सांगितलं, ‘आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी असते, जिच्यासमोर तुम्ही कोणताही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने व्यक्त होऊ शकता. माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे सई. ती अत्यंत निःस्वार्थी आहे आणि ती कोणालाही कधीही जज करत नाही. त्यामुळं मला कधीच तिच्यापासून कोणती गोष्ट लपवावीशी वाटली नाही. तिच्यासमोर बोलताना, वागताना मी कसलाही विचार करत नाही. आमची भेट झाली तेव्हा ती खूप शांत, लाजरी होती आणि मी गप्पिष्ट. आमच्या काही आवडीनिवडी जुळल्या आणि आम्ही घट्ट मैत्रिणी झालो. सई खूप शिस्तबद्ध, मेहनती आहे. ती खूप संयमी आहे आणि प्रत्येक गोष्ट ती विचारपूर्वक करते. तिच्या बोलण्यानं ती कधीही कोणाला दुखावत नाही. ती प्रत्येकाचा विचार करते.

आमच्यातील कमतरता सुधारण्यासाठी दोघीही एकमेकींना मदत करतो. कोणतंही काम ती सातत्यानं व मन लावून करते. प्रत्येक भूमिकेला ती न्याय देते. ‘देवयानी’, ‘लाडो’ आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकांत तिनं केलेली कामं मला आवडली. आमचा रोज एक तरी फोन असतोच आणि आम्ही एखाद्या रेसिपीपासून ते आंतरराष्ट्रीय समस्येपर्यंत कोणत्याही विषयावर बोलतो. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. बाहेर कुठं एकत्र गेलो की आमची आमची संभाषणाची एक वेगळी भाषा आहे आणि त्यात आम्ही बोलतो. आम्ही जे बोलतो ते आम्हा दोघींव्यतिरिक्त इतर कोणाला कळतही नाही आणि आमचा मुद्दा एकमेकींपर्यंत बरोबर पोहोचतो, इतकं आमचं बॉण्डिंग इतकं घट्ट आहे.’

सई समिधाबद्दल बोलताना म्हणाली, ‘मी करिअर करण्यासाठी मुंबईत आल्यावर मित्र-मैत्रिणी बनवणं हे माझं उद्दिष्ट नव्हतं. पण देवयानी मालिकेत आम्ही एकमेकींच्या सवतींची भूमिका करायचो. समिधाची मालिकेत एंट्री झाल्यावर सेटवर तिची सगळ्यात आधी माझ्याशीच मैत्री झाली, ती खुलत गेली. त्यावेळी आमचा स्वभाव व आमच्या आजूबाजूची परिस्थिती बऱ्यापैकी सारखी असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळं आमचे बोलण्याचे विषय, येणाऱ्या अडचणी या बऱ्यापैकी सारख्या होत्या. कालांतराने समिधा माझीच दुसरी आवृत्ती असल्याचं मला जाणवलं. ती मनात वेगळं आणि बोलताना वेगळं असं कधीच करत नाही. तिचा हा गुण मला आवडतो. कामाच्या बाबतीत ती मेहनती आहे. तिची सगळीच कामं मी पाहिली आहेत, पण तिनं ‘शुभमंगल ऑनलाइन मालिकेत साकारलेली भूमिका मला अतिशय आवडली. कमी कालावधीत तिनं कौतुकास्पद काम केलं आहे. ती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. आमच्यात आतापर्यंत कधीही मतभेद झाले नाहीत. मला एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला हवा असल्यास मी समिधालाच फोन करते, ती कायम माझ्या पाठीशी उभी असते. ती माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे. तिचं लग्नही माझ्या आधी झालं असल्यानं बहीण म्हणून संसारासंबंधी गोष्टीही ती सांगत असते. त्यामुळं सर्वार्थाने ती माझी गुरु आहे, असंच मी म्हणेन."

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com