'आदीपुरुष'मध्ये प्रभास आणि सैफ अली खान आमने-सामने, श्रीराम आणि रावण यांच्यानंतर आता सीतेची उत्सुकता

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

निर्मात्यांनी या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान खलनायकाची भूमिका साकारणार असून लंकेश या पात्राच्या भूमिकेत सैफ दिसून येणार आहे.

मुंबई- बाहुबली फेम सुपरस्टार प्रभासने नुकतंच 'आदीपुरुष' या सिनेमाचं पोस्टर लॉन्च केलं होतं. सिनेमाच्या पोस्टरमधूनंच खुलासा झाला होता की ही कथा रामायणपासून प्रेरित आहे. तसंच दिग्दर्शकाने देखील स्पष्ट केलं होतं की प्रभास यात भगवान रामाची भूमिका साकारत आहे. तसंच आता इतर पात्रांचा देखील हळूहळू खुलासा केला जात आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री काजोल भारत सोडण्याच्या तयारीत, मुलीसाठी घेतला 'या' देशात राहण्याचा निर्णय

'आदीपुरुष' हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत करत आहे. ओम राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं की प्रभास या सिनेमात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रभाससोबतंच आता इतर पात्रांविषयची उत्सुकता देखील वाढली आहे. नुकतंच निर्मात्यांनी या सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान खलनायकाची भूमिका साकारणार असून लंकेश या पात्राच्या भूमिकेत सैफ दिसून येणार आहे. 

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की रामायणमध्ये लंकेचा राजा म्हणजेच रावणाला लंकेश असं म्हटलं जातं. सैफ अली खान यामध्ये रावणाची भूमिका साकारणार असल्याने प्रभास आणि सैफ यात आमने-सामने येणार आहेत. ओम राऊत यांच्या 'तान्हाजी' या सिनेमात सैफने खलनायकाची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडली होती. या सिनेमात देखील खलनायक म्हणून सैफ अली खानची खूप चर्चा होती मात्र आता पोस्टरमधून यावर शिक्कामोर्तबंच झालं आहे. 

नुकत्याच रिलीज केलेल्या या पोस्टरमध्ये निळ्या अक्षरात A लिहीला असून रावणाची १० तोंडं देखील दिसून येत आहेत. या अक्षराच्या मध्यभागी श्रीराम धनुष्यबाणावर तीर ताणलेल्या स्वरुपात दिसत आहेत. याच्या खाली सैफ अली खानची ओळख सांगताना लिहिलंय, लंकेशच्या भूमिकेमध्ये सैफ अली खान. २०२२ मध्ये हा सिनेमा रिलीज केला जाणार असून अनेक भाषांमध्ये डब केला जाणार आहे.   राम आणि रावणनंतर आता सीतेच्या भूमिकेत कोण असणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

saif ali khan to play the villain in prabhas starrer adipurush second poster launch  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saif ali khan to play the villain in prabhas starrer adipurush second poster launch