esakal | सायरा बानू आयसीयूमध्येच; एंजिओग्राफीस दिला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

सायरा बानू आयसीयूमध्येच; एंजिओग्राफीस दिला नकार

सायरा बानू आयसीयूमध्येच; एंजिओग्राफीस दिला नकार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Saira Banu health updates ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू अद्याप आयसीयूमध्येच आहेत. रक्तदाबाशी संबंधित समस्येमुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बुधवारी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. सायरा बानू यांच्यावर उपचार करणारे डॉ. नितीन गोखले म्हणाले, "त्यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल झालं आहे. यामुळे त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल आणि त्यानंतर पुढील उपचार केले जातील." मात्र एंजिओग्राफी करण्यास सायरा यांनी डॉक्टरांना नकार दिला आहे.

सायरा बानू नैराश्यात

७७ वर्षीय सायरा बानू यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्या कोरोनाबाधित नाहीत, मात्र कोरोनाच्या नियमांनुसार त्यांना स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहेत. सायरा बानू या नैराश्यात असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. "त्यांची पुरेशी झोप होत नाही. मला घरी जायचं आहे, असं त्या सतत म्हणत आहेत", असं डॉक्टर म्हणाले. दिलीप कुमार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर जुलै महिन्यात दु:खाचा डोंगरच कोसळला. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाने सायरा बानो खूप खचल्या होत्या.

हेही वाचा: 'सिद्धार्थ खूप लवकर गेलास, तुझी नेहमीच आठवण येईल'

एंजिओग्राफी करण्यास नकार

"सायरा बानू यांची एंजिओग्राफी नंतर केली जाईल. त्या पूर्णपणे बऱ्या होताच आधी त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. नंतर एंजिओग्राफीसाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. एंजिओग्राफी करण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक आहे", असं डॉक्टर पुढे म्हणाले. मात्र सायरा बानू यांनी ही परवानगी नाकारली आहे.

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांचे निकटवर्तीय फैजल फारुखी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, "दिलीप साहब यांच्या निधनानंतर सायरा बानू पूर्णपणे खचल्या आहेत. गेल्या ५५ वर्षांतील प्रत्येक क्षण त्यांनी दिलीप साहब यांच्यासोबत व्यतित केला होता. त्यामुळे त्यांच्या दु:खाची कल्पना आपण करू शकतो. त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे."

loading image
go to top