'मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा..'; समंथाचा पालकांना मोलाचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu

'मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा..'; समंथाचा पालकांना मोलाचा सल्ला

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली. समंथाने काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्यला घटस्फोट दिल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावरील विविध पोस्टद्वारे ती तिची मतं मांडताना दिसली. इन्स्टा स्टोरीमध्ये तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून याद्वारे तिने पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. 'तुमच्या मुलीला अशा पद्धतीने घडवा, की तिच्याशी लग्न कोण करणार याची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. तिच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा, तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करा,' असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

समंथाने शेअर केलेली पोस्ट-

'तुमच्या मुलीला अशा पद्धतीने घडवा, की तिच्याशी लग्न कोण करणार याची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. तिच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा, तिच्या शिक्षणासाठी खर्च करा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या दृष्टीने तिला शिकवण देण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल तिला शिकवा. तिला स्वत:वर प्रेम करायला शिकवा, आत्मविश्वासाने वावरणं शिकवा आणि गरज भाजल्यास ती एखाद्याच्या कानशिलातही लगावू शकेल, इतरं सक्षम तिला बनवा', अशी पोस्ट समंथाने शेअर केली आहे.

घटस्फोटानंतर समंथा तिच्या मैत्रिणीसोबत चार धाम यात्रेला गेली होती. या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विविध गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा ती प्रयत्न करताना दिसतेय. नुकतंच तिने पेंटिंग करण्याचाही प्रयत्न केला. चार धाम यात्रेनंतर आता ती पुन्हा परदेशात फिरायला जाणार असल्याचं समजतंय.

घटस्फोटानंतर एका पोस्टद्वारे समंथाने तिच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी लिहिलं होतं. 'ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही अफवा पसरली आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत क्लेशकारक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण मी तुम्हाला वचन देते, या गोष्टींमुळे आणि ते जे काही म्हणतील त्याने मी खचून जाणार नाही,' अशी पोस्ट तिने लिहिली होती.

टॅग्स :Entertainmentsamantha