ऑन स्क्रीन : बंटी और बबली २ : फसवाफसवीचा फसलेला फार्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bunty Aur Babli 2
ऑन स्क्रीन : बंटी और बबली २ : फसवाफसवीचा फसलेला फार्स

ऑन स्क्रीन : बंटी और बबली २ : फसवाफसवीचा फसलेला फार्स

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

शाद अलीने दिग्दर्शित केलेल्या २००५मध्ये प्रदर्शित ‘बंटी और बबली’ या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी बंटी आणि बबलीची व्यक्तिरेखा कमालीची साकारली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तब्बल सोळा वर्षांनी दिग्दर्शक वरुण शर्मानं ‘बंटी और बबली २’ हा सिक्वेल आणला आहे. या चित्रपटात बंटीची भूमिका सैफ अली खाननं, तर बबलीची भूमिका राणी मुखर्जीनं साकारली आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरवरून आताही या वेळी बंटी व बबलीची जोडी लोकांना फसविणार, हे स्पष्ट होतं. पण यावेळी कुणाल (सिद्धांत चतुर्वेदी) आणि सोनिया (शर्वरी वाघ) यांचीही जोडी आहे. ही जोडी बंटी आणि बबलीच्या नावाने लोकांना फसवीत असते. खरं तर राकेश (सैफ अली खान) आणि विम्मी त्रिवेदी (राणी मुखर्जी) या बंटी आणि बबलीनं पंधरा वर्षापूर्वीच लोकांची फसवणूक करण्याचं सोडलेलं असतं. राकेश रेल्वेत तिकीट कलेक्टर असतो आणि विम्मी सामान्य गृहिणी. ते दोघंही आपल्या संसारात मग्न असतात, मात्र अचानक बंटी आणि बबलीच्या नावानं कुणी तरी फसवणूक करीत असल्याचं समोर येतं. पोलिस अधिकारी जटायू सिंह (पंकज त्रिपाठी) या नव्या बंटी आणि बबलीला शोधण्यासाठी राकेश आणि विम्मीची मदत घेतो. आपल्या ब्रॅण्डचा कुणी तरी वापर करीत आहे, असे या ओरिजनल बंटी व बबलीला वाटते आणि तेदेखील त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचं ठरवितात. मग नव्या बंटी व बबलीपर्यंत ते पोहोचतात का, पोलिसांना कशा प्रकारे मदत करतात आदी प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक वरूण शर्मानं सैफ अली खान, राणी मुखर्जी, पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट घेतली असून, सोबत सिद्धांत चतुर्वेदी व शर्वरी वाघ ही नवीन जोडी आहे. चित्रपटातील गाणी दमदार आहेत. काही लोकेशन्स डोळे दीपवणारी आहेत. मात्र, चित्रपटात काही तरी मिसिंग आहे. त्यामुळं पूर्वीच्या चित्रपटातील गंमत आणि ती मजा येत नाही. या चित्रपटातील काही बाबी अतार्किक वाटतात. चित्रपटाचा पूर्वार्ध कथा मांडण्यात जातो आणि उत्तरार्धात ती खूप ताणली गेली आहे.

सैफ अली खान, राणी मुखर्जी, पंकज त्रिपाठी यांचा अभिनय उत्तम. सैफ आणि राणीचं ट्युनिंग जमलं आहे. दोघांचा कॉमिक सेन्सही अफलातून आहे. राणीनं विम्मीच्या भूमिकेत गहीरे रंग भरले आहेत. पंकज त्रिपाठी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. सिद्धांत चतुर्वेदीनं आपल्या भूमिकेवर कमालीची मेहनत घेतलेली दिसते, तर शर्वरी वाघ सोनियाच्या भूमिकेत कमालीच्या आत्मविश्वासानं वावरली आहे. वरुण शर्माचं दिग्दर्शन प्रभावी झाले असलं, तरी लेखनात तो काहीसा कमी पडलेला जाणवतो. त्यामुळं चित्रपट हसतखेळत पुढं सरकत असला तरी फारसा खिळवून ठेवत नाही. ‘बंटी और बबली’ या चित्रपटाची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न फारसा सफल झालेला नाही.

loading image
go to top