ऑन स्क्रीन : चंद्रमुखी : सौंदर्य, कलेचा संगम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandramukhi Movie

‘चंद्रमुखी’ चित्रपट पाहिल्यावर उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीला दिग्दर्शक प्रसाद ओकने उत्तम चित्रपटरूपी साज चढवला आहे.

ऑन स्क्रीन : चंद्रमुखी : सौंदर्य, कलेचा संगम

‘चंद्रमुखी’ चित्रपट पाहिल्यावर उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीला दिग्दर्शक प्रसाद ओकने उत्तम चित्रपटरूपी साज चढवला आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अध्यक्ष अक्षय बर्दापूरकर यांची निर्मिती असलेला चित्रपट सौंदर्य आणि कलेचा उत्तम संगम म्हणता येईल.

धुरंधर व महत्त्वाकांक्षी नेता दौलतराव देशमाने आणि सौंदर्याची बावनखणी चंद्रमुखी यांची ही प्रेमकथा. या प्रेमकथेला विविध भावनिक पदर आहेत. हे दोघे भावनिकदृष्ट्या एकमेकांमध्ये कसे गुंतले आणि त्याचा राजकीय पटलावर कोणता परिणाम झाला याचा एक समयोचित मिलाफ आहे. चंद्रमुखी लावण्यवती असली, तरी एकूणच लोककलावंतांचे जीवन, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या बाबींवरही दिग्दर्शकाने हळुवार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

खासदार दौलतराव देशमाने (आदिनाथ कोठारे) हे राजकारणातील एक बडे प्रस्थ. आता ते राजकारणात मोठी झेप घेणार तोच त्यांच्या नजरेत चंद्रा (अमृता खानविलकर) नावाची तमाशा कलावंतीण भरते. चंद्राचे सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहिल्यानंतर कलाप्रेमी दौलतराव तिच्यात गुंतत जातात. चंद्रमुखीही नकळत त्यांच्याकडे ओढली जाते. दौलतराव आणि चंद्रा यांच्यामध्ये प्रेमाचे नाते फुलत जाते. एके दिवशी दौलतरावांची पत्नी डॉली-दमयंतीला (मृण्मयी देशपांडे) त्यांच्या प्रेमाची चाहूल लागते आणि मग नाट्यमय घडामोडी घडतात...

कादंबरीवर चित्रपट बनवणे जिकिरीचे काम. त्या कादंबरीतील विविध संदर्भ, त्यातील व्यक्तिरेखा, त्यातील एकूणच घटना आणि प्रसंग, त्यातील शब्दसौंदर्य पडद्यावर आणि तेही अडीच ते तीन तासांत मांडणे आव्हान असते, परंतु प्रसाद ओकने उत्तम पेलले आहे. कलाकारांची अचूक निवड, त्याला पटकथेची साथ, खणखणीत संवाद आणि अजय-अतुल यांचं मोहवून टाकणारं संगीत या गोष्टी छान जमून आल्या आहेत. चिन्मय मांडलेकरने चित्रपटाची पटकथा व संवाद लिहिले आहेत.

आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, डॉ. मोहन आगाशे, समीर चौगुले आदी कलाकारांची कसदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते. आदिनाथने साकारलेला रुबाबदार आणि तितकाच काहीसा हळवा राजकारणी रंगतदार झाला आहे. अमृताने चंद्रमुखीच्या भूमिकेत कमाल केली आहे. चंद्राची ग्रामीण भाषा, नृत्याविष्कार, नजाकत सारंच लाजवाब. बत्ताशा झालेला समीर चौगुलेही भाव खाऊन गेला आहे. संगीतकार अजय-अतुल यांच्या संगीताची उत्तम जोड चित्रपटाला लाभलेली आहे. ‘चंद्रा’ लावणीने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणेने आपल्या कॅमेऱ्याची जादू दाखवली आहे. मात्र, चित्रपटाची लांबी खटकणारी आहे. त्याचबरोबर नैना (प्राजक्ता माळी) आणि चंद्रा (अमृता खानविलकर) यांच्या सवाल जबाबाची लावणी गुंडाळण्यात आल्यासारखे वाटते. ती आणखी रंगतदार करता आली असती.

एकूणच, ‘चंद्रमुखी’ चित्रपट म्हणजे सौंदर्य आणि कलेचा उत्तम संगम आहे. कला आणि नृत्याचा आविष्कार आणि लोककलावंतांना मानाचा मुजरा आहे.

Web Title: Santosh Bhingarde Writes Chandramukhi Movie Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentmovie
go to top