ऑन स्क्रीन : सूर्यवंशी : मनोरंजनाचे उत्तम पॅकेज | sooryavanshi movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sooryavanshi movie
ऑन स्क्रीन : सूर्यवंशी : मनोरंजनाचे उत्तम पॅकेज

ऑन स्क्रीन : सूर्यवंशी : मनोरंजनाचे उत्तम पॅकेज

sakal_logo
By
- संतोष भिंगार्डे

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे पुरेपूर पॅकेज असते. आतापर्यंत त्याच्या प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल’, ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ अशा काही चित्रपटांतून हे सिद्ध झाले आहे. आता प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटदेखील त्याच पठडीत बसणारा आहे. टिपिकल रोहित शेट्टी स्टाइलचा हा चित्रपट आहे. डोळ्यांची पारणे फेडणारे अॅक्शन सीन्स, हवेत उडणाऱ्या गाड्या, समोरच्या बेंचर्सना आवडणारी कॉमेडी वगैरे वगैरे सगळा मसाला या चित्रपटात ठासून भरलेला आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटांच्या यशानंतर रोहित शेट्टीचे पोलिसांवरील प्रेम वाढले आणि त्याचाच परिणाम अक्षय कुमारला दहशतवादविरोधी पथकाचा प्रमुख सूर्यवंशी म्हणून आता आणण्यात आले आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अक्षय कुमारबरोबरच रणवीर सिंह आणि अजय देवगण यांची झालेली एन्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी ट्रीट आहे. हा चित्रपट अडीच तास छान करमणूक करणारा आहे.

या चित्रपटाची कथा कर्तव्यनिष्ठ आणि देशभक्त पोलिस अधिकारी वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार) याच्या भोवती फिरणारी आहे. सूर्यवंशी आपली पत्नी (कॅतरिना कैफ) आणि मुलाबरोबर आयुष्य जगत असला, तरी त्याचे आपल्या कर्तव्यावर-नोकरीवर खूप प्रेम असते. मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्याने त्याच्या आई-वडिलांना गमावलेले असते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड बिलाल (कुमुद मिश्रा) आणि ओमर हफीज (जॅकी श्रॉफ) या दोघांना शोधून काढणे, हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय बनते. मुंबई बॉम्बहल्ल्यासाठी वापरलेले आरडीएक्स अजूनही मुंबईत लपवून ठेवल्याची गुप्त माहिती त्याला मिळते. मुंबईत मोठ्या बॉम्बस्फोटाच्या कटाचे धागेदोरेही त्याच्या हाती लागतात. मग सूर्यवंशी हा कट हाणून पाडण्यासाठी अक्षरश: जिवाचं रान करतो. दहशतवाद्याचा हा कट उधळून लावण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सिम्बा (रणवीर सिंह) आणि सिंघम (अजय देवगण) त्याला साथ देतात. हे तिघेही पोलिस अधिकारी कशा प्रकारे दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडतात आणि मुंबईला कसे वाचवतात, हे चित्रपटात पाहणे उत्तम ठरेल.

या चित्रपटात विनोदाबरोबरच अॅक्शन, रोमान्स असा सगळा मसाला पुरेपूर भरण्यात आला आहे. रोहित शेट्टीने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्नही केला आहे. अक्षय कुमार, कॅतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा आदी कलाकारांचा दमदार अभिनय आहे. अक्षय कुमारने अॅक्शनबरोबरच छान विनोदनिर्मिती केली आहे. कॅतरिनाची भूमिका कमजोर वाटते. तांबेची भूमिका साकारणारा पोलिस अधिकारी आशिष वारंग लक्षात राहतो. शर्वरी लोहकरेने आपली भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. सिद्धार्थ जाधवची छोटी झलक सुखावह आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत जमून आले आहे. ‘टिप टिप बरसा पानी’ आणि ‘छोडो कल की बाते’ ही गाणी रिक्रिएट करण्यात आली आहेत आणि ती उत्तमरीत्या चित्रित करण्यात आली आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा लांबलेला वाटतो. तरीही मनोरंजनाचे एक उत्तम पॅकेज देण्यात रोहित शेट्टी आणि टीम यशस्वी झाली आहे.

loading image
go to top