सळसळती ऊर्जा देणारं गाव कोल्हापूर

संभाजी गंडमाळे
सोमवार, 8 एप्रिल 2019

कोल्हापूर सळसळती ऊर्जा देणारं गाव. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच करिअरला प्रारंभ केला आणि यशाचा एकेक टप्पा पार करत गेले. गाण्याच्या शिक्षणापासून आजपर्यंतच्या वाटचालीत जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच, हा कोल्हापूरनं दिलेला संस्कार फार मोलाचा ठरला.

 

कोल्हापूर सळसळती ऊर्जा देणारं गाव. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच करिअरला प्रारंभ केला आणि यशाचा एकेक टप्पा पार करत गेले. गाण्याच्या शिक्षणापासून आजपर्यंतच्या वाटचालीत जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच, हा कोल्हापूरनं दिलेला संस्कार फार मोलाचा ठरला...प्रसिद्ध गायिका सायली पंकज संवाद साधत होत्या. एकूणच कोल्हापूरविषयी भरभरून बोलत होत्या.

सायली २००९ मध्ये ‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिॲलिटी शोच्या विजेत्या ठरल्या आणि त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना पार्श्‍वगायनात खरा ‘ब्रेक’ मिळाला तो ‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘टिक टिक वाजते डोक्‍यात...’ या गाण्यानं. आजही हे गाणं साऱ्यांनाच भुरळ घालतं. 

प्रायव्हेट हायस्कूल आणि त्यानंतर देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये त्यांचं शिक्षण झालं. याच दरम्यान गाण्याची आवड ही केवळ आवड न राहता गाण्यातही करिअर करता येऊ शकतं, याची जाणीव झाली. कोल्हापुरातच वंदना आठल्ये यांच्याकडं त्यांचं गाण्याचं शिक्षण सुरू झालं. पुढे श्रीनिवास खळे, देवकी पंडित, सुरेश वाडकर यांच्याकडेही त्यांनी शिक्षण घेतलं.

२००६ मध्ये मुंबई गाठली आणि त्यानंतर तीन वर्षांतच ‘गौरव महाराष्ट्राचा’ या रिॲलिटी शोमध्ये बाजी मारली. चित्रपटासाठी पार्श्‍वगायन, दूरचित्रवाणी मालिकांसाठी शीर्षकगीतं गाणं हे सारं सुरू असतानाच ‘दुनियादारी’च्या ‘टिक टिक’नं एकूणच इंडस्ट्रीत वेगळं स्थान मिळवून दिलं. अनेक बक्षिसं आणि पुरस्कारांची लयलूटच या गाण्यानं केली.

त्यानंतर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘वंटास’, ‘यूथ ट्यूब’, ‘शिमगा’ आदी चित्रपटांसाठी गाणी गायिली. ‘रात्रीस खेळ चाले’चं शीर्षकगीत असो किंवा ‘१०० डेज्‌’च्या शीर्षकगीतातील आलाप साऱ्यांनाच भावला. आगामी ‘अरुणा’ या चित्रपटासह आणखी काही चित्रपटगीतांना सायली यांचा स्वरसाज असेल. त्या सांगतात, ‘‘कोल्हापुरातून आलेल्या कलाकाराला मुंबईत सन्मान मिळतो. कारण त्याच्यावर कोल्हापूरचा संस्कार असतो.

अजून खूप लांब पल्ला गाठायचा आहे. कोल्हापुरातही आता अनेक मोठे कार्यक्रम, फेिस्टव्हल होतात. अशा कार्यक्रमांना निमंत्रित केल्यास नक्कीच येईन. कारण कोल्हापुरात येऊन गाणं सादर करणं म्हणजे माझ्यासाठी कोल्हापूरच्या मातीला वंदन करण्याची एक पर्वणी असते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sayalie Pankaj interview