
नेटफ्र्लिक्सची बहुचर्चित वेब सिरीज 'बार्ड ऑफ ब्लड' अखेर प्रदर्शित झाली आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी हा सिरीजमधून प्रेक्षकांसमोर आला.
मुंबई : नेटफ्र्लिक्सची बहुचर्चित वेब सिरीज 'बार्ड ऑफ ब्लड' अखेर प्रदर्शित झाली आहे. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी हा सिरीजमधून प्रेक्षकांसमोर आला. शाहरुख खान प्रोडक्शनमध्ये ही वेब सिरीज तयार करण्यात आली. सिरीजची कथा गुप्तहेरीविषयी आहे. लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या पुस्तकावर आधारीत ही कथा आहे.
इमरान यामध्ये कबीर आनंद नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ही स्पाय थ्रीलर सिरीज भारतातील गुप्तहेराची कथा आहे जो आपल्या साथीदारांना तालिबान्यांच्या तावडीतून वाचविण्यासाठी बलुचिस्तानला जातो. कबीर गुप्तहेर असतो मात्र त्याने काम बंद केलेलं असतं. त्यानंतर तो शिक्षक होतो आणि आपल्या साध्या आयुष्यात व्यस्त होतो. या सर्व काळातच त्याच्या आयुष्यात अशी एक मोठी घटना घडते ज्यामळे त्याला पुन्हा एकदा मिशनवर जाण्यास भाग पाडते. त्यामुळे तो परत अॅक्शनच्या दुनियेत एन्ट्री करतो. कबीर एक सच्चा देशभक्त आहे आणि जेव्हा देशाला त्याची गरज भासते तेव्हा तो त्याच्या मुळ रुपात वापसी करतो. एकुणच या सिरीजमध्ये प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन पाहायला मिळेल.
इमरानच्या करीअरला कलाटणी देणारी अशी वेगळी भूमिका त्याने या सिरीजमध्ये साकारली आहे. रोमॅंटिक आणि हॉरर यापेक्षा हटके अॅक्शन सिरीज त्याने केली आणि प्रेक्षकांकडून चांगली पसंतीदेखील मिळत आहे. सिरीजचे दिग्दर्शक ऋभु दासगुप्ता यांनी याआधी अमिताभ बच्चन यांचा 'तीन' हा चित्रपट तयार केला होता. मात्र या सिरीजनंतर लक्षात येते की त्यांनी अतिशय रंजकपणे ही सिरीज तयार केली आहे. एकुणच सिरीजचं दिग्दर्शन चांगल्या पद्धतीने करण्यात आलं आहे. सिरीजमध्ये अॅक्शनसह रोमॅन्सचा तडकादेखील देण्यात आलाय. अनेक ट्विस्ट, गुप्तहेरांची चालाखी, अॅक्शन, फाईट हे सर्व घटक प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे आहेत.
एका दिवसातच या सिरीजला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या सिरीजची चर्चा पाहायला मिळतेय. इमरान शिवाय मुख्य भूमिकेत यामध्ये सोभिता धुलिपाला, विनीत कुमार सिंह आणि जयदीप अहलावत ही मंडळी आहेत. तर, किर्ती कुल्हारी, रजित कपूर, शिशिर शर्मा, अमित बिमरोट, दानिश हुसैन हे कलाकार सपोर्टींग रोलमध्ये दिसत आहेत. पहिल्या सिझननंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनची अपेक्षा आहे.