esakal | "बॉलिवूडच्या फक्त नकारात्मक गोष्टी दाखवल्या जातात"
sakal

बोलून बातमी शोधा

shakti kapoor

"बॉलिवूडच्या फक्त नकारात्मक गोष्टी दाखवल्या जातात"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडमध्ये जवळपास पाच दशके काम केलेला अभिनेता म्हणजे शक्ती कपूर Shakti Kapoor. अभिनेता शक्ती कपूर यांनी कॉमेडी भूमिकांसोबतच गंभीर आणि खलनायकाच्या भूमिकासुद्धा तेवढ्याच ताकदीने पडद्यावर साकारल्या आहेत. ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडवर टीका केली जात आहे. यावर शक्ती कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. "हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल बोलल्या जाणाया नकारात्मक गोष्टींचा मला त्रास होतो. इंडस्ट्रीतील कलाकारांना मी एकमेकांची मदत करतानाच पाहिले आहे," असं ते म्हणाले.

“गेल्या अनेक वर्षांपासून मी ही चित्रपटसृष्टी बघतोय. मी असं ठामपणे म्हणू शकतो की ही एक सर्वोत्तम इंडस्ट्री आहे. लोक फिल्म इंडस्ट्रीबद्दल नेहमीच नकारात्मक बोलतात. पण इथे असेही लोक आहेत जे नेहमी तुमच्या मदतीसाठी उभे असतात. पण दुर्दैवाने चांगल्या गोष्टी कधी समोर येत नाहीत, फक्त नकारात्मक गोष्टीच बाहेर येतात. हे खरंच अत्यंत दुःखद आहे की फिल्म इंडस्ट्रीमधील केवळ नकारात्मक बाबींवरच प्रकाश टाकला जातो”, अशा शब्दांत शक्ती कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: आर्यनसोबत अटकेत असलेल्या अरबाज मर्चंटच्या वडिलांकडून NCB चं कौतुक

चित्रपटसृष्टीत दिल्लीतून कोणीही ओळखीचं नसताना त्यांनी मला आपलंसं केलं आणि खूप प्रेम दिलं, असं ते म्हणाले. "माझ्या आजूबाजूला नेहमीच चांगली माणसे होती. बॉलिवूडमध्ये मला मदत करण्यासाठी माझ्याकडे दादा, काका, मामा नव्हते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी फिरोज खानला भेटलो आणि तो माझा आवडता अभिनेता बनला. नंतर, सुनील दत्त यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून मला काम दिले. एवढेच नाही तर त्यांनीच मला 'शक्ती' हे नाव दिले. माझं खरं नाव सुनील आहे.”

शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने इंडस्ट्रीत स्वत:चं नाव कमवत आहे. स्वतःच्या अभिनयकौशल्यावर ती प्रेक्षकांकडून वाहवा मिळवत आहे. याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. “श्रद्धा एक मोठी स्टार आहे आणि आता मुलगा सिद्धांतसुद्धा त्याच्या करिअरच्या मार्गावर आहे. मला माझ्या मुलांचा खूप अभिमान आहे. लोक माझ्या मुलीचे कौतुक करतात आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो. ती या कोविड काळातसुद्धा काम करत आहे आणि सिद्धांतसुद्धा त्याच्या कामात खूप व्यस्त आहे", असं ते म्हणाले.

loading image
go to top