Movie Review- शेर शिवराज.....हिंदवी स्वराज्याचे सुवर्णपान

दिग्पाल लांजेकरने शिवराज अष्टकातील चौथे पुष्प शेर शिवराज हा चित्रपट
sher shivraj movie review in marathi chinmay mandlekar digpal lanjekar  movie on chhatrapati shivaji maharaj
sher shivraj movie review in marathi chinmay mandlekar digpal lanjekar movie on chhatrapati shivaji maharajsakal

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड असे तीन चित्रपट यापूर्वी आणलेले होते. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. आता या अष्टकातील चौथे पुष्प शेर शिवराज हा चित्रपट आणलेला आहे. या चित्रपटात चित्तथरारक असा प्रतापगडचा रणसंग्राम दाखविण्यात आला आहे. क्रूरकर्मा,कपटी आणि तितकाच बलाढ्य अशा अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी कसा केला....त्याकरिता त्यांनी कशा प्रकारे युद्धनीती अवलंबिली...मानसिकदृष्टय़ा तसेच शारीरिकदृष्टया समोर ठाकलेल्या अफलजखानासारख्या बलाढ्य शत्रूचे खच्चीकरण कसे केले....त्याच्या जुलमी राजवटीतून जनतेला कसे मुक्त केले...याचे थरारक-रोमांचक चित्रण या चित्रपटात आहे. शिवाजी महाराज यांचे अनोखे युद्धकौशल्य, त्यांच्या अंगी असलेले अद््भुत गुण आणि त्यांची विचार करण्याची पद्धती...समोरील शत्रू बलाढ्य असेल तर त्याला गनिमी काव्याने कसे जेरबंद करायचे किंवा त्याच्यावर कसा विजय मिळवायचा वगेरे बाबी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या चित्रपटातून मांडल्या आहेत. त्याकरिता दिग्पाल आणि त्याच्या टीमचे कौतुक करावेच लागेल.

प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई मानली जाते. हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट बनून आलेल्या क्रूरकर्मा अफजलखानचा वध शिवाजी महाराजांनी अत्यंत कुशलतेने आणि चतुराईने केला आणि स्वराज्याचे रक्षण केले. शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आदिलशहाला पळता भुई थोडी केली होती. त्यामुळे त्यांना थोपविण्यासाठी विजापूरच्या भर दरबारात बडी बेगम शिवाजी महाराजांना पकडून आणेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा करते. खरे तर ही कामगिरी वाटते तितकी सोपी नसते. दरबारातील कुणीही सरदार या कामगिरीस पुढे येत नाही. मग अशातच एक उंच धिप्पाड सरदार पुढे येतो.

शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचा विडा तो उचलतो. त्या सरदाराचे नाव अफझलखान. तो कपटी होता आणि तितकाच डावपेच खेळण्यात हुशार होता...शूर होता. त्याने यापूर्वी शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी राजे यांची हत्या केली होती तसेच शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजांच्या हातापायात बेड्या घालून त्यांची धिंड त्याने काढली होती. त्यामुळे शहाजी राजे व त्याच्यामध्ये हाडवैर होते. मात्र आदिलशहाची खानावर मर्जी होती. त्यामुळे त्याला भली मोठी फौज देण्यात आली. खूप मोठा फौजफाटा आणि दारूगोळा घेऊन खान निघतो.

मजल-दमजमल

करीत येत असताना वाटेमध्ये असणारी हिंदूंची धार्मिक स्थळे त्याने उद््ध्वस्त केली शिवाय अनेक गोरगरीबांवर-आया-बहिणींवर अनन्वित अत्याचार केले. खान स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे हे शिवाजी महाराजांना समजताच ते आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलात असलेल्या प्रतापगडावर हलवितात. खान हळूहळू प्रवास करून वाई या ठिकाणी आपला मुक्काम ठोकतो. कारण वाई या ठिकाणचा तो सुभेदार राहिलेला असतो. त्यामुळे त्याला तेथील इत्थंभूत माहिती असते. वाईला शिवाजी महाराजांना भेटायला बोलवायचे आणि आपला डाव साधायचा असा त्याचा प्लाॅन असतो. परंतु खानाचा हा डाव महाराज चांगलेच ओळखून असतात. तेथे भेटायला गेलो तर कपटी खान काही तरी दगाफटका करणार याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट निश्चित ठरते.

त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. शिवाजी महाराजांनी शक्तिशाली, धिप्पाड आणि तितकाच पराक्रमी अशा अफजलखानाचा वध करून हिंदवी स्वराज्याचे रक्षण कसे केलं हे आपल्या इतिहासातील लिहिले गेलेले एक सुवर्णपान आहे आणि दिग्पाल लांजेकरने या चित्रपटाद्वारे हे पान हळूवारपणे आणि इतिहासाला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी घेत या चित्रपटाद्वारे उलगडले आहे. खरं तर आपल्याला शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला एवढाच इतिहास माहीत असला तरी खानाला ठार मारताना महाराजांनी कशा प्रकारची युद्धनीती अवलंबिली...शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते हे तत्त्व कसे वापरले...राजमाता जिजाऊंनी त्यांना कसे प्रेरित केले...कसा आणि कोणता गनिमी कावा त्यांनी वापरला आदी बारीकसारीक तपशील या चित्रपटामध्ये चपखलपणे मांडण्यात आला आहे. कलाकारांच्या अभिनयाची उत्तम साथ लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर आहे आणि त्याने पु्न्हा एकदा हे शिवधनुष्य यथार्थपणे उचलले आहे.

बडी बेगमच्या भूमिकेत अभिनेत्री वर्षा उसगावकर आहे आणि तिनेही या भूमिकेला आपल्या कुशल अभिनयाने चार चांद लावले आहेत. मृणाल कुलकर्णी (जिजाऊ आऊसाहेब), अजय पुरकर (सुभेदार तानाजी मालुसरे), दिग्पाल लांजेकर (बहिर्जी नाईक), समीर धर्माधिकारी (कान्होजी जेधे), अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (केसर) अक्षय वाघमारे (पिलाजी गोळे), विक्रम गायकवाड (सरनोबत नेताजी पालकर), आस्ताद काळे (विश्वास दिघे), वैभव मांगले (शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील), सुश्रुत मंकणी (येसाजी कंक) आदी कलाकारांनी आपापल्या भूमिकेत गहिरे रंग भरलेले आहेत.

अफजलखानाची भूमिका अभिनेता मुकेश ऋषीने केली आहे. त्याने या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. त्याची चालण्याची आणि बोलण्याची ढब, एकूणच त्याची देहबोली आणि त्याचा दरारा व कपटी स्वभाव या भूमिकेतून मुकेशने छान अधोरेखित केल्या आहेत. अभिनेता वैभव मांगलेने नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारली आहे आणि या भूमिकेत तो कमालीचा भाव खाऊन गेला आहे. चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. तरुण संगीतकार देवदत्त बाजीने दिलेले संगीत नक्कीच प्रभावी झाले आहे. यापूर्वीही त्याने दिग्पालच्या फत्ते शिकस्त, फर्जंद आणि पावनखिंड या चित्रपटांना संगीत दिले होते. त्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातील त्याची कामगिरी उत्तम झाली आहे. पूर्णिमा ओक यांनी केलेली वेशभूषा आणि सानिका गाडगीळ यांची रंगभूषा यैचाहा दखल नक्कीच घ्यावी लागेल. तरीही चित्रपटातील काही बाबी नक्कीच खटकणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे सईबाई राणी सरकार यांच्या ट्रॅकची आवश्यकता होती का...हा प्रश्न मनाला पडतो. त्यामुळे चित्रपटाची लांबी वाढलेली आहे. ती कमी करता आलीअसती. तरीही दिग्पालने आपल्या इतिहासातील हे एक सुवर्णपान उत्तमरीत्या पडद्यावर रेखाटले आहे असेच म्हणावे लागेल.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com